भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या निर्णायक सामन्यात यजमान भारताने न्यूझीलंडला डोकेही वर न काढू देता 168 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. भारतीय संघाचा हा मायदेशातील सलग 24 वा मालिका विजय ठरला.
https://twitter.com/BCCI/status/1620824106844438528?t=HvvC7wGSSj6zl6ok3D9R7w&s=19
नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ईशान किशन लवकर बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठी याने मोर्चा सांभाळत वेगवान 44 धावा केल्या. दुसऱ्या बाजूने गिलने 35 चेंडूंवर सात चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर त्याने आपल्या खेळाची गती वाढवली. त्याने अर्धशतक ते शतक हा टप्पा केवळ 19 चेंडूंमध्ये पूर्ण केला. त्याचवेळी गिल व कर्णधार हार्दिक पंड्या यांच्या दरम्यान 103 धावांची भागीदारी झाली. गिलने अखेरपर्यंत नाबाद राहत 126 धावांची खेळी केली. यासह भारताने निर्धारित 20 षटकात 234 धावा काढल्या.
या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडची अवस्था अगदीच दयनीय झाली. पहिल्या षटकात हार्दिक पंड्याने फिन ऍलन याला बाद केले. तर, दुसऱ्या षटकात अर्शदीपने दोन जणांना तंबूचा रस्ता दाखवला. 21 धावांवर त्यांचा निम्मा संघ तंबूत परतला होता. डेरिल मिशेल याने अखेरपर्यंत संघर्ष केला मात्र तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. भारताने न्यूझीलंडचा डाव अवघ्या 66 धावांवर संपवत तब्बल 168 धावांनी विजय संपादन केला. भारतासाठी कर्णधार हार्दिक पंड्याने चार, तर उमरान मलिक, अर्शदीप सिंग व शिवम मावी यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. टी20 इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा विजय ठरला.
(India Beat Newzealand By 186 Runs In Ahmedabad T20I Gill Hardik Shine)






