श्रीलंकेच्या डंबुला येथे खेळल्या गेलेल्या महिला आशिया चषक 2024 च्या दुसऱ्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ संपूर्ण षटकं फलंदाजी करू शकला नाही. संघ 19.2 षटकांत 108 धावा करून गडगडला. प्रत्युत्तरात, टीम इंडियानं 14.1 षटकांत 109/3 धावा करून लक्ष्य गाठलं.
नाणेफेक जिंकून पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र संघाचे दोन्ही सलामीवीर गुल फिरोजा आणि मुनिबा अली स्वस्तात बाद झाले. फिरोजानं 5 तर मुनिबानं 11 धावा केल्या. आलिया रियाझ 6 धावा करून तंबूत परतली. कर्णधार निदा दार देखील काही विशेष करू शकली नाही. ती फक्त 8 धावा करून बाद झाली. सिद्रा अमीननं थोडाफार संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. तिनं 35 चेंडूत 25 धावांची खेळी खेळली. ती 13व्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतली. अखेर फातिमा सनानं 16 चेंडूत नाबाद 22 धावा केल्यामुळे पाकिस्तानची धावसंख्या 100 च्या पुढे गेली. भारतीय संघाकडून दीप्ती शर्मानं सर्वाधिक 3 बळी घेतले. तर रेणुका सिंग, पूजा वस्त्राकार आणि श्रेयंका पाटील यांनी 2-2 बळी घेतले.
109 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात झंझावाती झाली. शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी आपला उत्कृष्ट फॉर्म जारी ठेवत पॉवरप्लेमध्येच 57 धावा ठोकल्या. या दोघांच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर टीम इंडिया 10 गडी राखून विजय मिळवेल की काय, असं वाटत होतं. मात्र स्मृती 10व्या षटकात 85 च्या स्कोरवर बाद झाली. तिनं 31 चेंडूत 9 चौकारांसह 45 धावा केल्या.
शेफाली वर्मा 29 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 40 धावा करून बाद झाली. तर दयालन हेमलतानं 14 धावांचं योगदान दिलं. अखेर कर्णधार हरमनप्रीत कौर (5) आणि जेमिमाह रॉड्रिग्स (3) यांनी नाबाद राहून संघाला 15व्या षटकात विजय मिळवून दिला. पाकिस्तानकडून सईदा अरुब शाहनं सर्वाधिक 2 बळी घेतले.
महत्त्वाच्या बातम्या –
“त्याचं शुबमन गिलसारखं नशीब कुठे…”, माजी मुख्य निवडकर्त्याचे भारतीय संघ व्यवस्थापनावर ताशेरे
बीसीसीआयचा योग्य निर्णय, रवींद्र जडेजाला एकदिवसीय संघातून वगळण्याची 3 कारणं जाणून घ्या
फक्त 3 वर्षांत टीम इंडियाने पाहिलेत तब्बल 11 कर्णधार! चौघे आहेत महाराष्ट्रीयन…