सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंका दौऱ्यावर धमाकेदार कामगिरी केली आहे. टीम इंडियानं 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत यजमान श्रीलंकेला क्लीन स्वीप करून इतिहास रचला. पल्लेकेले येथे मंगळवारी (30 जुलै) खेळला गेलेला शेवटचा सामना अतिशय रोमांचक होता. हा सामना टाय झाला, त्यानंतर भारतीय संघानं सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला.
भारतीय संघानं मालिकेतील पहिला सामना 43 धावांनी जिंकला होता. यानंतर दुसरा सामना 7 विकेटने जिंकून मालिकेवर कब्जा केला. आता तिसरा सामनाही जिंकून टीम इंडियानं क्लीन स्वीप केला आहे. तिसऱ्या सामन्याच्या सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाला 3 धावांचं लक्ष्य मिळालं. सूर्यानं महिष तिक्षीनाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारून सामना जिंकला.
सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 137 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात, श्रीलंकेच्या संघानंही 8 गडी गमावून 137 धावा केल्या आणि सामना बरोबरीत सोडवला. कुसल परेरानं 46 आणि कुसल मेंडिसनं 43 धावांची खेळी केली. तर पथुम निसांकानं 26 धावा केल्या. रिंकू सिंगनं भारतासाठी 19 वं षटक टाकलं, ज्यात त्यानं 2 बळी घेतले. त्यानंतर शेवटच्या षटकात श्रीलंकेला 6 धावांची गरज असताना सूर्या स्वतः गोलंदाजीसाठी आला. त्यानं 2 बळी घेत या षटकात केवळ 5 धावा दिल्या आणि सामना बरोबरीत आणला.
या सामन्यात भारतीय संघानं बरेच प्रयोग केले, जे चुकीचे ठरले. संजू सॅमसनला नंबर-3 आणि रिंकू सिंगला नंबर-4 वर पाठवण्यात आलं, जे फ्लॉप ठरले. संजू शून्यावर तर रिंकू 1 धावेवर बाद झाला. भारतीय संघानं केवळ 48 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या. यानंतर शुबमन गिल आणि रियान पराग यांनी 40 चेंडूत 54 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सांभाळला.
गिल 39 आणि पराग 26 धावा करून बाद झाले. शेवटी वॉशिंग्टन सुंदरनं 25 धावा केल्या. याशिवाय एकही फलंदाज क्रीझवर टिकू शकला नाही. भारतीय संघानं 9 बाद 137 धावा केल्या. श्रीलंकेकडून महिष तिक्षानानं 3 तर वानिंद हसरंगानं 2 बळी घेतले. रमेश मेंडिस, चामिंडू विक्रमसिंघे आणि असिथा फर्नांडो यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
हेही वाचा –
IND vs SL सलग दोन वेळा ‘हा’ खेळाडू शून्यावर बाद, चाहत्यांनी दिला निवृत्तीचा सल्ला
श्रीलंकेत असूनही दुरावा, भारताच्या 6 खेळाडूंचा वेगळा सराव; कोच गंभीरच्या डोक्यात नेमकं काय आहे?
“पाकिस्तानात येऊन खेळून दाखवा” पाकिस्तानचा माजी खेळाडू हरभजनवर भडकला