शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. येथे संघाची दमदार कामगिरी जारी आहे. पहिला टी20 सामना गमावल्यानंतर भारतीय संघानं जोरदार पुनरागमन करत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. भारतीय संघाने दुसरा सामना 100 धावांनी तर आता तिसरा सामना 23 धावांनी जिंकला.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातल्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना बुधवारी (10 जुलै) हरारे स्पोर्ट्स क्लब स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं 20 षटकांत 4 गडी गमावून 182 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, झिम्बाब्वेचा संघ 6 गडी गमावून 159 धावाच करू शकला.
झिम्बाब्वेकडून फलंदाजी करताना डिऑन मायर्सने 49 चेंडूत नाबाद 65 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. तर यष्टीरक्षक क्लाइव्ह मदंडेनं 26 चेंडूत 37 धावा केल्या. या व्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज आपली छाप सोडू शकला नाही. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरनं 3 आणि आवेश खानने 2 बळी घेतले. खलील अहमदनं एक विकेट घेतली.
भारताकडून यशस्वी जयस्वालनं शुबमन गिलच्या साथीनं सलामी दिली. गिलनं कर्णधारपदाला साजेशी खेळी करत 49 चेंडूत 66 धावा केल्या. या दरम्यान त्यानं 3 षटकार आणि 7 चौकार लगावले. तर यशस्वीनं 27 चेंडूत 36 धावा केल्या. मधल्या फळीत ऋतुराज गायकवाडनं 28 चेंडूत 49 धावांची खेळी केली.
गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या अभिषेक शर्माला या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आलं. मात्र त्याला केवळ 10 धावाच करता आल्या. झिम्बाब्वेकडून कर्णधार आणि फिरकी गोलंदाज सिकंदर रझानं 2 बळी घेतले. तर ब्लेसिंग मुजराबानीला 2 बळी मिळाले.
महत्त्वाच्या बातम्या –
प्रथम टीम इंडियासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली, त्यानंतर न खेळवताच बाहेर करण्यात आले हे 2 युवा खेळाडू
भारताला WTC विजेतेपद मिळवून देईल हा स्टार खेळाडू, 6 वर्षांपूर्वी खेळला होता शेवटचा कसोटी सामना
कोहली-रोहित नव्हे तर या फलंदाजाला गोलंदाजी करणं अवघड जातं, जेम्स अँडरसनचा खुलासा