जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात आज चौथा वनडे सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारताला ६ सामन्यांच्या वनडे मालिकेत विजयी आघाडी घेण्याची सुवर्ण संधी आहे.
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे पहिले तीनही सामने जिंकले आहे. या तीनही सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी विजय मिळवले आहेत. भारतीय कर्णधार विराट कोहली स्वतः चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने आणि पहिले तीनही सामन्यात यश मिळाले असल्याने भारतीय संघात आत्मविश्वास दिसून येत आहे.
विराटने या मालिकेत आत्तापर्यंत २ शतके झळकावली आहेत. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना त्याला या मालिकेत फक्त एकदाच बाद करता आले आहे. त्यामुळे उद्या त्यांच्या समोर विराटला रोखण्याचे मोठे आव्हान असेल.
विराटबरोबरच या मालिकेत शिखर धवनेही चांगला खेळ केला आहे. कसोटीत मालिकेत त्याला खेळताना अपयश आले होते मात्र त्याने मागील दोन सामन्यात सलग अर्धशतके करून तो चांगल्या फॉर्ममध्ये परतला असल्याची पावती दिली आहे. तसेच उद्याचा सामना शिखरचा १०० वा वनडे सामना असल्याने खास असणार आहे.
तरीही भारताला मधल्या फळीच्या कामगिरीची चिंता आहे. तसेच रोहित शर्माही आत्तापर्यंतच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अपयशी ठरला आहे. अजिंक्य रहाणे, एमएस धोनी, हार्दिक पंड्या आणि केदार जाधव यांनी अजूनतरी खास काही केले नाही.
भारतीय गोलंदाजांनी मात्र या मालिकेत उत्तम कामगिरी केली आहे. युझवेन्द्र चहल आणि कुलदीप यादव ही भारताची फिरकी गोलंदाजांची जोडी चांगलीच गाजली. या दोघांनी मिळून दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीला कमजोर केले आहे. त्यांनी या मालिकेत आत्तापर्यंत मिळून २१ विकेट्स घेतल्या आहेत.
भारताने आत्तापर्यंत दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे भारतीय संघ उद्याच्या सामन्यात विजय मिळवून इतिहास घडवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. पण त्याच बरोबर दक्षिण आफ्रिकाही त्यांना कडवी झुंज देण्याचा प्रयत्न करेल हे नक्की.
याबरोबरच दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज एबी डिव्हिलियर्स पुनरागमन करणार असल्याने दक्षिण आफ्रिका संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. तो बोटाच्या दुखापतीमुळे पहिले तीन सामने संघाबाहेर होता. तसेच दक्षिण आफ्रिकेचा नियमित कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि क्विंटॉन डिकॉकही दुखापतीमुळे उर्वरित मालिकेला मुकणार आहेत.
त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघर्ष करताना दिसत आहे. उद्याचा सामना हा गुलाबी सामना म्हणून खेळवला जाईल. स्तनाच्या कर्करोगाची जागरूकता म्हणून हा गुलाबी सामना ओळखला जातो. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ गुलाबी जर्सी परिधान करून मैदानात उतरेल.
आजपर्यंत तरी दक्षिण आफ्रिकेने गुलाबी सामन्यात पराभव स्वीकारलेला नाही. यात २०१३ साली भारताविरुद्ध झालेल्या वनडे सामन्याचाही समावेश आहे. त्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने १४१ धावांनी विजय मिळवला होता.
उद्या सामना ज्या मैदानात होणार आहेत तिथे मोठ्या धावसंख्येचे सामने बऱ्याचदा बघायला मिळाले आहेत, त्यामुळे उद्याची खेळपट्टीही तशीच असण्याची शक्यता आहे.
यातून निवडले जातील संघ
भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन,अजिंक्य रहाणे, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेन्द्र चहल, श्रेयश अय्यर, दिनेश कार्तिक,मनीष पांडे, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर.
दक्षिण आफ्रिका संघ: एडिन मार्करम(कर्णधार), हाशिम अमला, एबी डिव्हिलियर्स, जेपी ड्युमिनी, इम्रान ताहीर, हेन्रिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मोर्ने मॉर्केल, ख्रिस मॉरीस, लुंगीसानी एन्गिडी,अँडिल फेहलूकवयो, कागिसो रबाडा, ताब्राईझ शम्सी, खाया झोन्डो, फरहान बेहार्डीन.