बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आता स्पर्धेचा फक्त एक दिवस शिल्लक असून, केवळ काही पदकांसाठी खेळाडू रस्सीखेच करताना दिसून येतील. याचाच अर्थ सर्व देशांना एकमेकांना मागे टाकण्याच्या काही संधी आहेत. भारत देखील चौथ्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावेल. रविवारचा दिवस भारतासाठी चांगलाच लाभदायी ठरला. रविवारी भारताला ५ सुवर्णांसह एकूण १५ पदके मिळाली. मात्र, यानंतरही भारत पाचव्या स्थानावर आहे. आता अखेरच्या दिवशी न्यूझीलंडला पछाडत चौथ्या स्थानावर पोहोचण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे.
रविवारी मिळाले दणदणीत यश
भारतासाठी रविवार (७ ऑगस्ट) बॉक्सिंग, टेबल टेनिस आणि ऍथलेटिक्समध्ये यशस्वी ठरला. बॉक्सिंगमध्ये भारताने चारपैकी तीन सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकून पदकतालिकेत आपले स्थान मजबूत केले. त्याचबरोबर ऍथलेटिक्समध्ये सर्वांना चकित करत तिहेरी उडीत सुवर्ण आणि रौप्यपदक मिळवले. ऍथलेटिक्समध्ये रविवारी १ सुवर्ण, २ रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण ४ पदके आली. टेबल टेनिसमध्ये ही एक सुवर्ण आणि एक कांस्यपदक भारताच्या पदरात पडले. भारतीय महिला क्रिकेट संघाने देखील रौप्य पदक जिंकले.
अखेरच्या दिवशी चार सुवर्णपदकांची संधी
भारताला आता स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी बॅडमिंटनमधील महिला एकेरी, पुरुष एकेरी आणि पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत सुवर्ण जिंकण्याची संधी आहे. त्याच वेळी, बहुतेकांचे लक्ष भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या पुरुष हॉकी अंतिम सामन्यावर असेल. जिथे भारताकडे ऑस्ट्रेलियाची सलग ६ वेळा सुवर्णपदक जिंकण्याची बनण्याची मालिका खंडित करण्याची संधी असेल.
पदकतालिकेत ऑस्ट्रेलियाचे ६५ सुवर्णपदकांसह १७२ पदके मिळवून वर्चस्व कायम आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी अनुक्रमे इंग्लंड (५५ सुवर्ण/ १६६ पदके) व कॅनडा (२४ सुवर्ण/ ८९ पदके) आहेत. चौथ्या स्थानी असलेल्या न्यूझीलंडच्या नावे १८ सुवर्णपदके आहेत. तर पाचव्या स्थानी असलेल्या भारताच्या नावावर रविवारपर्यंत १७ सुवर्ण, १५ रौप्य व २२ कांस्यपदके जमा होती.