भारतीय संघाने अंतिम सामन्यात इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करत सहाव्यांदा अंडर-19 विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. या ऐतिहासिक विजयाचा खरा नायक ठरला तो म्हणजे 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi). त्याने केवळ 80 चेंडूत 175 धावांची वादळी खेळी खेळली. या खेळीत त्याने चौकार-षटकारांचा पाऊस पाडत सर्वांना आश्चर्यचकित केले. या खेळीसाठी वैभवला ‘सामनावीर’ (Man of the Match) आणि ‘मालिकावीर’ (Player of the Tournament) म्हणून गौरवण्यात आले.
विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर वैभव म्हणाला, खूप छान वाटतंय. गेल्या 6 ते 8 महिन्यांपासून प्रत्येक खेळाडूने आणि आमच्या कोचिंग स्टाफने खूप मेहनत घेतली आहे. मला मिळालेला हा पुरस्कार मी आमच्या सपोर्ट स्टाफला समर्पित करतो. आम्ही फायनलचा जास्त दबाव घेतला नाही, जे संपूर्ण स्पर्धेत करत आलो तेच आम्ही मैदानावर केलं. मला माझ्या कौशल्यांवर विश्वास होता आणि मोठ्या सामन्यात चांगली कामगिरी करण्याची जिद्द होती.
इंग्लंडच्या गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरलेल्या वैभवने या सामन्यात अनेक रेकॉर्ड्स मोडले. अवघ्या 55 चेंडूत शतक पूर्ण करत वर्ल्ड कप फायनलच्या इतिहासात सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा मान मिळवला. केवळ 71 चेंडूत 150 धावा पूर्ण करून नवा विश्वविक्रम रचला. एका डावात सर्वाधिक 15 षटकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला.






