१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने आज ऑस्ट्रेलिया संघावर १०० धावांनी विजय मिळवून विश्वचषकाची विजयी सुरवात केली. भारताकडून कर्णधार पृथ्वी शॉने चमकदार कामगिरी करत सामनावीराचा पुरस्कारही पटकावला.
भारताने दिलेल्या ३२९ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने सुरुवात चांगली केली होती. त्यांचा सलामीवीर जॅक एडवर्ड्सने अर्धशतकी खेळी केली. त्याने ९० चेंडूत ७३ धावांची खेळी करताना ६ चौकार आणि १ षटकार मारला. पण बाकी फलंदाजांना खास काही करता आले नाही.
ऑस्ट्रेलियाकडून मॅक्स ब्रायंट(२९), जेसन संघा(१४), जोनाथन मेरलो(३८),विल सदरलँड(१०) आणि बॅक्सटर जे होल्ट(३९) यांनी थोडीफार लढत दिली पण बाकी फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही.
भारताकडून शिवम मावी(३/४५), कमलेश नागरकोटी(३/२९), अभिषेक शर्मा(१/३३) आणि अनुकूल रॉय(१/३६) यांनी बळी घेत ऑस्ट्रेलियाचा डाव ४२.५ षटकात २२८ धावांवर संपुष्टात आणला.
तत्पूर्वी भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताचे सलामीवीर पृथ्वी आणि मनज्योत कारला यांनी १८० धावांची सलामी भागीदारी रचून भारताला दमदार सुरुवात मिळवून दिली. पृथ्वीने १०० चेंडूत ९४ धावांची खेळी केली. त्याचे शतक फक्त ६ धावांनी हुकले. त्याने केलेल्या या खेळी त्याने ८ चौकार आणि २ षटकार मारले.
त्याचा साथीदार मानज्योतनेही अर्धशतकी खेळी करताना ९९ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. हे दोघे बाद झाल्यानंतर शुभम गिलने देखील आक्रमक अर्धशतक करत भारताला आणखी भक्कम स्थितीत नेवून ठेवले. त्याने ५४ चेंडूत ६३ धावा केल्या. भारताच्या बाकी फलंदाजांनी काही धावा करत भारताच्या धावसंख्येत भर घातली.
या तीन अर्धशतकांच्या जोरावर भारताने ७ बाद ३२८ धावांची मजल मारली. ऑस्ट्रेलियाकडून जॅक एडवर्ड्स (४/६५), विल सदरलँड (१/५५),परम उपल (१/३५)आणि ऑस्टिन वॉ (१/६४) यांनी बळी घेतले.