टी20 विश्वचषक 2024 च्या सराव सामन्यात भारतानं बांगलादेशचा 60 धावांनी पराभव केला. शनिवारी (1 जून) न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेशसमोर विजयासाठी 183 धावांचे लक्ष्य होतं. मात्र संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 122 धावाच करू शकला.
बांगलादेशकडून महमुदुल्लाह रियाधनं 28 चेंडूंत 4 चौकार आणि एका षटकारासह 40 धावा केल्या. तर शाकिब अल हसननं 34 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 28 धावा केल्या. भारताकडून शिवम दुबे आणि अर्शदीप सिंगनं प्रत्येकी 2 बळी घेतले. तर जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक यश मिळविलं.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं पाच गड्यांच्या मोबदल्यात 182 धावा केल्या होत्या. भारतासाठी रिषभ पंतनं रिटायर्ड होण्यापूर्वी 32 चेंडूत 53 धावांची खेळी केली. पंतनं आपल्या खेळीत 4 चौकार आणि 4 षटकार मारले. तर हार्दिक पांड्यानं 23 चेंडूंत 4 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 40 धावा केल्या. सूर्यकुमार यादवनं 31 आणि कर्णधार रोहित शर्मानं 23 धावांचं उपयुक्त योगदान दिलं. बांगलादेशकडून महेंदी हसन, शोरीफुल इस्लाम, महमुदुल्लाह आणि तन्वीर इस्लाम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. या सामन्यासाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. तर संजू सॅमसन रोहित शर्मासोबत सलामीला आला.
टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघ आयर्लंड, पाकिस्तान, यूएसए आणि कॅनडा सोबत ‘अ’ गटात आहे. भारतीय संघाचे पहिले तीन गट सामने न्यूयॉर्कमध्ये होणार आहेत. टीम इंडियाचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध असेल. दुसरा सामना 9 जून रोजी पाकिस्तानशी होणार आहे. तर भारतीय संघ 12 जून रोजी अमेरिकेविरुद्ध तिसरा गट सामना खेळणार आहे. भारताचा शेवटचा गट सामना 15 जून रोजी कॅनडाविरुद्ध फ्लोरिडामध्ये होणार आहे.
टी20 विश्वचषक 2024 साठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान
महत्त्वाच्या बातम्या –
या नियमामुळे फलंदाजी करणाऱ्या संघाला 5 धावा मिळतील मोफत! टी20 विश्वचषकात लागू होण्याची शक्यता
दिनेश कार्तिकची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, इमोशनल पोस्ट करून मानलं चाहत्यांचं आभार