धरमशाला। शनिवारी (२६ फेब्रुवारी) भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील (T20I Series) दुसरा सामना (2nd T20I) झाला. या सामन्यात भारताने ७ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने टी२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. याबरोबर भारताने पाकिस्तानच्या एका विश्वविक्रमाची बरोबरी देखील केली आहे.
हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाला (HPCA Stadium) येथे झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात मिळवलेला विजय भारताचा श्रीलंकेविरुद्धचा १६ वा आंतरराष्ट्रीय टी२० विजय होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध सर्वाधिकवेळा विजय मिळवण्याच्या पाकिस्तानच्या विश्वविक्रमाशी भारताने बरोबरी केली आहे. पाकिस्तानने झिम्बाब्वेविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये १६ विजय मिळवले आहेत.
भारताने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत श्रीलंकेविरुद्ध २४ सामने खेळले आहेत. त्यातील १६ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तसेच ७ सामने श्रीलंकेने जिंकले आहेत, तर एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.
आता भारताला पाकिस्तानला मागे टाकण्याचीही संधी आहे. कारण भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी२० मालिकेतील अखेरचा सामना रविवारी (२७ फेब्रुवारी) होणार आहे. या सामन्यात भारताने विजय मिळवल्यास भारताचा श्रीलंकेविरुद्धचा हा १७ वा विजय ठरेल. त्यामुळे भारत आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध सर्वाधिकवेळा विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत पाकिस्तानला मागे टाकत अव्वल क्रमांकावर येईल (Most wins against an opponent in T20Is).
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारे संघ –
१६ विजय – पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे
१६ विजय – भारत विरुद्ध श्रीलंका
१५ विजय – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड
१५ विजय – पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज
भारताने जिंकला दुसरा टी२० सामना
दुसऱ्या टी२० सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. श्रीलंकेनेही या आमंत्रणाचा स्विकार करत चांगली फलंदाजी केली. त्यांनी प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १८३ धावा केल्या. श्रीलंकेकडून पाथम निसंकाने ७५ धावांची सर्वोत्तम खेळी केली. तसेच कर्णधार दसून शनकाने नाबाद ४७ आणि दनुष्का गुलतिलकाने ३८ धावांचे महत्त्वपूर्ण योगादान दिले. भारताकडून भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी १ विकेट घेतली.
त्यानंतर १८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक नाबाद ७४ धावांची खेळी केली. तसेच रविंद्र जडेजाने नाबाद ४५ आणि संजू सॅमसननेही ३९ धावांचे योगदान दिले. त्यामुळे भारताने हे आव्हान १७.१ षटकात ३ विकेट्स गमावत सहज पूर्ण केले. श्रीलंकेकडून लहिरू कुमाराने २ आणि दुष्मंता चमिराने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
इशान किशन डोक्याला चेंडू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल, ‘अशी’ घडली हृदयाचा ठोका चुकवणारी घटना