मंगळवार रोजी (२२ मार्च) भारत विरुद्ध बांगलादेश (INDW vs BANW) यांच्यात आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ चा (Women ODI World Cup) २२ वा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित ५० षटकांमध्ये ७ विकेट्सच्या नुकसानावर २२९ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ ११९ धावांवरच सर्वबाद झाला. परिणामी भारताने ११० धावांनी हा महत्त्वपूर्ण सामना जिंकला आहे.
या विजयानंतर भारतीय संघाने गुणतालिकेत एका स्थानाने झेल घेतली असून संघ तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताने वेस्ट इंडिजला मागे सोडत या स्थानावर ताबा मिळवला आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाने बांगलादेशवर मोठ्या अंतराने विजय मिळवला असल्याने संघाचा नेट रन रेट चांगलाच सुधारला आहे. यामुळे त्यांची उपांत्य फेरीत पोहोचण्याची समीकरणेही सोपी झाली आहेत.
गुणतालिकेत सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वाधिक १२ गुणांसह अव्वलस्थानी आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ ८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाने फार पूर्वीच उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यांच्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचेही उपांत्य फेरीतील स्थान निश्चित आहे.
भारताची उपांत्य फेरीत पोहोचण्याची समीकरणे
अशात भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचणारा तिसरा संघ होऊ शकतो. भारताला त्यांचा शेवटचा साखळी फेरी सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचा आहे. जर भारतीय संघाने हा सामना जिंकला, तर ते सहज उपांत्य फेरीत प्रवेश मिळवतील. मात्र हा सामना गमावल्यानंतरही भारतीय संघाच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या अपेक्षा जिवंत राहतील.
The race for the #CWC22 semi-finals spots heats up 🔥 pic.twitter.com/Lz4ZhLnXcW
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 22, 2022
कारण गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेल्या वेस्ट इंडिजला त्यांचा शेवटचा साखळी फेरी सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच खेळायचा आहे. अशात वेस्ट इंडिजने हा सामना गमावला तर त्यांच्या खात्यातही भारताइतकेच ६ गुण राहतील. अशावेळी नेट रन रेटच्या जोरावर भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचेल. भारताचा नेट रन रेट +०.७६८ आहे. तर वेस्ट इंडिजचा नेट रन रेट -०.८८५ आहे. मात्र वेस्ट इंडिजने सामना जिंकला तर त्यांचे गुण ८ होतील आणि भारताचा उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग अवघड होईल.