पर्थ। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आॅप्टस स्टेडीयम, पर्थ येथे दुसरा सामना सुरु असून आज या सामन्याचा चौथा दिवस सुरु आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 243 धावा करत पहिल्या डावातील 43 धावांच्या आघाडीसह भारतासमोर 287 धावांचे आव्हान ठेवले आहे.
पण या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अडखळत सुरुवात झाली आहे. भारताने 4 षटकांच्या आतच केएल राहुल आणि चेतेश्वर पुजाराची विकेट गमावली आहे. राहुलला पहिल्याच षटकात मिशेल स्टार्कने त्रिफळाचीत केले आहे. तर पुजाराला चौथ्या षटकात जोश हेजलवूडने बाद केले. यष्टीरक्षक टीम पेनने त्याचा झेल घेतला.
पुजाराने 4 धावा केल्या आहेत. तर राहुलला भोपळाही फोडता आलेला नाही.
तत्पुर्वी, या सामन्यात आॅस्ट्रेलियाने आज 4 बाद 132 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. त्यांचे काल नाबाद असणारे टीम पेन आणि उस्मान ख्वाजा यांनी आजही चांगली सुरुवात केली.
या दोघांनीही पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. पण दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच षटकात मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर पेन(37) बाद झाला. पेनचा झेल भारताचा कर्णधार विराट कोहलीने घेतला.
त्याच्या पुढच्याच चेंडूवर काल रिटायर्ड हर्ट झालेला अॅरॉन फिंचला शमीने यष्टीरक्षक रिषभ पंतकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर काही वेळात 72 धावावंर खेळत असलेल्या उस्मान ख्वाजालाही शमीने फिंचप्रमाणेच बाद केले.
त्याच्या पुढील षटकात बुमराहने पॅट कमिन्सला(1) त्रिफळाचीत करत आॅस्ट्रेलियाला 8 वा धक्का दिला. काही वेळात नॅथन लायनला(5) बाद करत शमीने या सामन्यातील त्याची सहावी विकेट घेतली. पण त्यानंतर जोश हेजलवूड(17*) आणि मिशेल स्टार्क(14) यांनी चांगली फलंदाजी करत आॅस्ट्रेलियाला 243 धावसंख्या गाठून दिली.
या डावात भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 56 धावांत 6 विकेट घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराहने 39 धावांत 3 आणि इशांत शर्माने 45 धावांत 1 विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या:
–Video: भारत-आॅस्ट्रेलियाच्या कर्णधारांमध्येच झाली शाब्दिक चकमक, लायनने घेतले सावरुन
–कोणत्याच भारतीय कर्णधाराला न जमलेली गोष्ट विराट कोहलीने करुन दाखवली
–हॉकी विश्वचषक २०१८: गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला मानावे लागले कांस्य पदकावर समाधान