पल्लेकेल: येथे सुरू असलेल्या श्रीलंका आणि भारत विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या शिखर धवनने खणखणीत शतक लगावले तर के एल राहुलने अर्धशतकी खेळी केली. यामुळेच भारतीय संघाने दिवसाखेर ३२९/६ एवढी मजल मारली.
पहिल्या दिवशी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एका सामन्यासाठी बंदी घालण्यात आलेल्या जडेजाच्या जागी कुलिप यादवला संघात स्थान देण्यात आले तर बाकी संघ मागील सामान्य प्रमाणेच होता.
पहिल्या दिवशी फलंदाजी करताना भारताच्या सलामीवीरांनी चमकदार कामगिरी केली. धवनने आपले या मालिकेतले दुसरे शतक लगावले तर के एल राहुलने ही अर्धशतकी खेळी केली. भारताने पहिल्या विकेट्ससाठी १८८ धावांची भागीदारी केली, पण धवन प्रमाणे राहुल शतकी खेळी करू शकला नाही, तो ८५ धावांवर बाद झाला. त्यांनतर धवन ही ११९ धावांवर बाद झाला.
मागील सामन्यातील दोन्ही शतकवीर पुजारा आणि राहणे या डावात त्यांच्या नावाला साजेशी कामगिरी करू शकले नाहीत. पुजारा ८ तर राहणे १७ धावा करून तंबूत परतला. विराट कोहलीने भारतीय संघाला चहापानाच्या सत्रानंतर स्थिरावण्याचा प्रयत्न केला पण तो ही ४२ धावांवर बाद झाला. त्यानंतर शेवटची काही षटके राहिलेली असताना अश्विनही विश्वा फरण्यन्डोचा शिकार बनला. तरीही भारत ३२९-६ अश्या सुस्थितीत आहे. आता भारताकडून साहा आणि हार्दिक पंड्या खेळत आहेत. उद्या जर यांनी चांगला खेळ केला तर भारत नक्कीच ४०० धावा करेल.
श्रीलंकेकडून सनदाकन आणि पुश्पकुमारने अनुक्रमे २ आणि ३ विकेट्स घेतल्या तर विश्वा फरण्यन्डोने १ विकेट घेतली. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी या मालिकेत या आधी कधीच कसोटीच्या पहिल्या दिवशी एवढ्या विकेट्स घेतल्या नाहीत. हा श्रीलंकेचा आतापर्यंतच्या मालिकेतला सर्वात चांगला दिवस होता असे म्हणायला हरकत नाही.