रायपूर येथे खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात इंडिया लिजेंड्सने श्रीलंका लिजेंड्सचा १४ धावांनी पराभव करत पहिल्यावहिल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचे विजेतेपद आपल्या नावे केली. अष्टपैलू कामगिरी करणारा युसूफ पठाण अंतिम सामन्याचा मानकरी ठरला. नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
भारताची आव्हानात्मक धावसंख्या
अंतिम सामन्यात श्रीलंका लिजेंड्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सलामीवीर वीरेंद्र सेहवाग या सामन्यात अपयशी ठरला. त्यानंतर, कर्णधार सचिन तेंडुलकरने ३० धावांचे योगदान दिले. मात्र, इंडिया लिजेंड्सच्या डावाला खरा आकार दोन अष्टपैलू युवराज सिंग व युसुफ पठाण यांनी दिला. युवराजने पुन्हा एकदा गोलंदाजांची धुलाई करत ४१ चेंडूमध्ये ६० धावा बनविल्या. यात प्रत्येकी चार चौकार व चार षटकारांचा समावेश होता. युसूफ पठाणच्या ३६ चेंडूतील नाबाद ६२ धावांच्या जोरावर इंडिया लिजेंड्सने १८१ धावा फलकावर लावल्या.
गोलंदाजांची किफायतशीर गोलंदाजी
इंडिया लिजेंड्सने दिलेल्या १८२ धावांच्या आव्हानाच्या प्रत्युत्तरात श्रीलंका लिजेंड्सचे फलंदाज चांगल्या सुरुवातीनंतर नियमित अंतराने बाद होत गेले. सलामीवीर सनथ जयसूर्याने ४३ धावा ठोकल्या. अखेरीस, कौशल्य वीररत्ने (१५ चेंडू ३८ धावा) व चितांका जयसिंगे (३० चेंडू ४० धावा) यांनी फटकेबाजी करत सामन्यात रंग भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेरच्या दोन षटकांत मनप्रीत गोनी व मुनाफ पटेल यांनी नियंत्रित मारा करून भारताचा विजय निश्चित केला. भारतासाठी पठाण बंधूंनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
🏆 We have our first champions of the @Unacademy Road Safety World Series, an intense final sees the #IndiaLegends come out on top after a close contest against the indomitable #SriLankaLegends. pic.twitter.com/96Fo51pXcA
— Road Safety World Series (@RSWorldSeries) March 21, 2021
सामाजिक संदेशाचा हेतूने आयोजित केली गेली होती स्पर्धा
जगभरातील नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षेविषयी जनजागृती करण्याच्या हेतूने या स्पर्धेचे आयोजन केले गेले होते. या स्पर्धेमध्ये सहा देशांच्या निवृत्त क्रिकेटपटूंनी भाग घेतलेला. भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर हे या स्पर्धेचे ब्रँड अँबेसिडर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंड विरुद्धच्या मालिका विजयानंतर टीम इंडियाला फायदा; टी२० क्रमवारीत ‘या’ क्रमांकावर विराजमान
भारत-इंग्लंड टी२० मालिकेत दिसले ‘मुंबई कनेक्शन’
युसुफ, युवराजने मिळून केली तब्बल ९ षटकारांची बरसात, चाहत्यांच्या आल्या ‘अशा’ प्रतिक्रिया