पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज’ या स्पर्धेसाठीच्या इंडिया लिजेंड्स संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाचे कर्णधारपद मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरडे देण्यात आले आहे. एकूण १२ खेळाडूंचा या संघात समवेश करण्यात आला आहे. या स्पर्धेत भाग घेणारे इंग्लंड लिजेंड्स संघाचे खेळाडू आज (२६ फेब्रुवारी) रायपुर येथे दाखलही झाले आहेत. या स्पर्धेचे सगळे सामने रायपुरच्या शहीद वीर नारायण स्टेडियमवर खेळवले जातील.
इंडिया लिजेंड्सच्या संघात सचिन तेंडुलकरसह वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, मोहम्मद कैफ, युसूफ पठाण तसेच नमन ओझा या फलंदाजांचा समावेश आहे. आणि जहीर खान, प्रग्यान ओझा, नोएल डेविड, मुनाफ पटेल, इरफान पठाण आणि मनप्रीत गोनी या गोलंदाजांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती घेतलेला नमन ओझा पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळताना दिसेल. येत्या सोमवार अथवा मंगळवारपर्यंत इंडिया लिजेंड्स संघ रायपुरला पोहोचेल.
आजपासूनच विदेशी संघ रायपुरमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. आज (२६ फेब्रुवारी) ६.४५ला इंग्लंड लिजेंड्सचा संघ रायपुरात दाखल झाला आहे. याशिवाय बांग्लादेशचा संघही उद्या म्हणजे २७ फेब्रुवारीला या स्पर्धेसाठी दाखल होईल. या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना ५ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता इंडिया लिजेंड्स आणि बांग्लादेश लिजेंड्स या संघांमध्ये खेळवला जाईल. छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल या स्पर्धेचे उद्घाटन करतील.
दरम्यान, इंडिया लिजेंड्स संघाव्यतिरिक्त कोणत्याही इतर संघांची अधिकृत घोषणा करण्यात आली नाहिये. मागील वर्षी झालेल्या सामन्यांमध्ये तिलकरत्ने दिलशानने श्रीलंका लिजेंड्स संघाचे कर्णधारपद भूषवले होते. जॉन्टी ह्रोड्सने दक्षिण आफ्रिकेचे तर ब्रायन लाराने वेस्ट इंडिजचे नेतृत्व केले होते. यावेळी पहिल्यांदाच सामील होणाऱ्या बांग्लादेश संघाचे नेतृत्व खालिद महमूद करेल. तर केव्हिन पीटरसन इंग्लंड लिजेंड्स संघाचा कर्णधार असेल.
महत्वाच्या बातम्या:
खरंच अहमदाबाद कसोटीची खेळपट्टी होती खराब? जाणून घ्या काय आहेत आयसीसीचे नियम