भारतीय संघ पुढील वर्षी जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिका दौरा करत आहे. ह्या दौऱ्यात अपेक्षाप्रमाणे ४ कसोटी सामने, ५ वनडे आणि ३ टी२० सामने होणे अपेक्षित होते.
परंतु भारतीय बोर्डाने नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात श्रीलंकेला भारतात आमंत्रित केले आहे. श्रीलंकेचा हा भारत दौरा २४ डिसेंबर रोजी संपणार आहे. दक्षिण आफ्रिका बोर्डाला भारतीय संघाबरोबर पहिला कसोटी सामना अपेक्षेप्रमाणे २६ डिसेंबर अर्थात बॉक्सिंग डेला होणे अपेक्षित होते. परंतु भारताने याला नकार देऊन पहिला सामना ५ जानेवारीला घेण्याचे सुचवले. शिवाय त्याबरोबर एक सराव सामना खेळवण्याचा हट्ट देखील केला.
त्यामुळे आधी ठरल्याप्रमाणे हा दौरा ४ कसोटी सामने, ५ वनडे आणि ३ टी२० सामन्यांचा न होता ३ कसोटी सामने, ६ वनडे आणि ३ टी२० सामन्यांचा होणार आहे. भारताच्या या दौऱ्याचे वेळापत्रक पुढील ४-५ दिवसांत जाहीर होणार आहे.
यामुळे बॉक्सिंग डेला आफ्रिका बोर्डाने झिम्बाब्वे संघाला आमंत्रित करून ४ दिवसांचा कसोटी सामना घेण्याचा घाट घातला आहे. आयसीसीच्या ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या मीटिंगमध्ये याला मान्यता मिळाली तर असा कसोटी सामना आयोजित करणारा आफ्रिका पहिला देश बनेल.