जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची सुरुवात अडखळत झाली आहे. भारताला पहिले दोन धक्के लवकर बसले आहेत.
भारताचे दोन्ही सलामीवीर फलंदाज १३ धावांवरच बाद झाले आहेत. प्रथम व्हर्नोन फिलँडरने सामन्याच्या चौथ्या षटकात पहिल्याच चेंडूवर केएल राहुलला शून्य धावेवरच झेलबाद केले. दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटॉन डिकॉकने त्याचा सुरेख झेल घेतला.
त्याच्या नंतर काहीवेळातच नवव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कागिसो रबाडाने मुरली विजयला देखील क्विंटॉन डिकॉककडे झेल देण्यास भाग पाडले. विजय ८ धावांवर बाद झाला.
सध्या चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली खेळत आहे. भारताने १२ षटकात २ बाद १७ धावा केल्या आहेत. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.