१९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने १६ षटकांत १ बाद १०३ धावा केल्या आहेत. भारतीय संघाला अजूनही ११४ धावांची जिंकण्यासाठी गरज आहे.
सध्या मैदानावर संपूर्ण विश्वचषकात चांगली कामगिरी केलेले मनजोत कार्ला (४५) आणि शुभमन गिल २१ धावांवर खेळत आहेत.
कर्णधार पृथ्वी शॉ १२व्या षटकात २९ धावांवर तंबूत परतला असून संयमी फलंदाजी केली तर भारताला या स्पर्धेत सहज विजेतेपद मिळणार आहे.
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर ५० षटकात २१७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
ऑस्ट्रेलियाने सकाळी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांची सुरवात अडखळत झाली. भारताचा वेगवान गोलंदाज ईशान पोरेलने मॅक्स ब्रायंट(१४) आणि जॅक एडवोर्ड(२८) या दोन्ही सलामीवीरांना लवकर बाद केले. त्यानंतर लगेचच कमलेश नागरकोटीने ऑस्ट्रेलिया कर्णधार जेसन संघाला(१३) बाद केले.
या खराब सुरवातीनंतर मात्र जोनाथन मेर्लो आणि परम उपाल(३४) यांनी डाव सावरत ७५ धावांची भागीदारी रचली. जोनाथनने १०२ चेंडूत ७६ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याला उपाल बाद झाल्यावर नॅथन मॅक्स्विन्नीनेही(२३) चांगली साथ दिली होती. पण पुन्हा एकदा शेवटच्या काही षटकात ऑस्ट्रेलियाच्या तळातल्या फलंदाजांना विशेष काही करता न आल्याने त्यांनी नियमित अंतराने बळी गमावले.
भारताकडून ईशान पोरेल(२/३०), कमलेश नागरकोटी(२/४१), शिवा सिंग(२/३६), शिवम मावी(१/४६) आणि अनुकूल रॉय(२/३२) यांनी बळी घेत ऑस्ट्रेलियाचा डाव ४७.२ षटकात २१६ धावांवर संपुष्टात आणला.