हेडिंग्ले| इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील नॉटिंघम कसोटी सामना अनिर्णीत राहिल्यानंतर लॉर्ड्स येथे अखेर भारताने विजयी पताका झळकावली. यजमान इंग्लंडला १५१ धावांनी पराभूत करत त्यांनी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मात्र सांघिक प्रदर्शनानंतर मिळालेल्या विजयाच्या जल्लोषाआड फ्लॉप ठरलेल्या खेळाडूंची कामगिरी मात्र दडली गेली. त्यातीलच एक नाव म्हणजे, रविंद्र जडेजा याचे.
हा अष्टपैलू फलंदाजीत विशेष योगदान देऊ शकला नाही. गोलंदाजीत तर त्याने सर्वांना खूपच निराश केले. त्यामुळे येत्या लीड्सवरील तिसऱ्या सामन्यात त्याच्याजागी आर अश्विन याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
रविंद्र जडेजाने नाही घेतली एकही विकेट
पहिल्या २ कसोटी सामन्यात अष्टपैलू जडेजाला मुख्यत्त्वे त्याच्या फलंदाजीसाठी खेळवण्यात आले होते. पण पहिल्या डावातील ५६ धावांची खेळी वगळता तो विशेष योगदान देऊ शकला नाही. याव्यतिरिक्त दोन्ही सामन्यात ४४ षटके टाकूनही त्याला साधी एक सुद्धा विकेट घेता आली नाही. लॉर्ड्स कसोटी सामन्यात तर इंग्लंडचे फलंदाज त्याचा सहज सामना करताना दिसले. याउलट प्रतिस्पर्धी इंग्लंड संघाचा फिरकीपटू अष्टपैलू मोईन अलीने याच मैदानावर ३ विकेट्स घेतल्या. त्यामुळे खेळपट्टीही फिरकी गोलंदाजांना थोडीफार मदत असल्याचे दिसत होते. तरीही जडेजाच्या झोळीत एकही विकेट पडली नाही.
चिंताजनक बाब म्हणजे, जडेजाने इंग्लंड दौऱ्यावर आल्यापासून केवळ २ विकेट्स घेतल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात १ आणि काउंटी सिलेक्ट इलेव्हनविरुद्ध सराव सामन्यात १ अशा २ विकेट्स त्याने घेतल्या आहेत.
लीड्सची खेळपट्टी आर अश्विनसाठी सोईस्कर
याउलट अश्विनने आतापर्यंत चांगले प्रदर्शन केले आहे. कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात ४ विकेट्स आणि सर्रे संघाकडून काउंटी सामना खेळताना त्याने ७ विकेट्सची कामगिरी केली होती.
याखेरीज तिसऱ्या सामन्यासाठीची लीड्सची खेळपट्टीही अश्विनला मदत करू शकते. कारण हा सामना ‘ड्राय कंडिशन’मध्ये होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पावसाची शक्यताही कमी आहे. त्यामुळे सामन्यादरम्यान ऊन असेल. या कारणास्तव कर्णधार विराट कोहलीला संघाच्या गोलंदाजी विभागात बदल करावे लागतील. यावेळी तो ३ वेगवान गोलंदाज आणि २ फिरकीपटूंसह उतरु शकतो. मात्र जर सामन्यापूर्वी पाऊसाचे सावट दिसले तर, संघ ४ वेगवान गोलंदाज आणि एकमेव फिरकीपटू अश्विनसह जाण्याचा विचार करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
जबरा सेलिब्रेशनचे जबरा चाहते! मोहम्मद सिराजच्या विशेष जल्लोषाचे हैदराबादमध्ये भलेमोठे कट-आऊट
‘कर्णधार कोहलीच्या आदेशानंतरच बुमराहने इंग्लंडच्या खेळाडूला जखमी करण्याचा प्रयत्न केला’
लॉर्ड्स कसोटीचा वचपा काढण्यासाठी जो रूटची तयारी, ‘या’ नव्या रणनितीसह उतरणार मैदानात!