बुधवारपासून (१९ जानेवारी) दक्षिण आफ्रिका व भारत यांच्या दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका (SAvIND ODI Series) पर्ल येथे सुरू होणार आहे. एका मोठ्या कालावधीनंतर भारतीय संघ वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. यावेळी संघाचे नेतृत्व प्रथमच केएल राहुलच्या हाती असेल. मालिकेतील या पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल यावर आपण नजर टाकूया.
सलामीवीर-
संघाचा नवनियुक्त कर्णधार केएल राहुल याने सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत आपण सलामीला फलंदाजी करणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच त्याचा साथीदार म्हणून अनुभवी शिखर धवनची वर्णी लागू शकते. त्यामुळे महाराष्ट्राचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याला बाकावर बसावे लागेल.
मधली फळी-
मधल्या फळीत फलंदाज म्हणून भारतीय संघाकडे काही मोठी नावे आहेत. संघाचा माजी कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. तर, चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर फलंदाजीला येऊ शकतो. पाचव्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव याला संधी मिळणे निश्चित आहे.
यष्टीरक्षक व फिनीशर-
भारतीय संघाकडे यष्टिरक्षक म्हणून ईशान किशन व रिषभ पंत असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शतक केल्याने रिषभ पंत या जागेवर आपला हक्क सांगू शकतो. मात्र, संघ व्यवस्थापनाने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतल्यास ईशान यष्टिरक्षक म्हणून संघात सामील होईल. तसेच संघाचा अष्टपैलू म्हणून व्यंकटेश अय्यर हादेखील आपले आपले वनडे पदार्पण करणार असल्याचे कर्णधाराने सांगितले आहे.
फिरकीपटू-
कसोटी मालिकेत अपयशी ठरलेला रविचंद्रन अश्विन हा प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवतो का? हे पाहणे रंजक ठरेल. अन्यथा, त्याच्या जागी युजवेंद्र चहल याला संधी दिली जाईल.
वेगवान गोलंदाज-
कसोटी मालिकेत समजदार कामगिरी केल्यामुळे शार्दुल ठाकुर याला अंतिम अकरामध्ये संधी मिळणे निश्चित आहे. तसेच उपकर्णधार जसप्रीत बुमराह हा देखील या सामन्यात संघाचे प्रतिनिधित्व करेल. तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून भुवनेश्वर कुमार अथवा मोहम्मद सिराज या दोघांपैकी एकाची वर्णी लागेल.
पहिल्या वनडेसाठी संभाव्य भारतीय संघ-
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल.
महत्त्वाच्या बातम्या-
वनडे मालिकेत टीम इंडियाला छळू शकतो पदार्पणवीर वेगवान गोलंदाज (mahasports.in)
टीम इंडियाला दिलासा! दक्षिण आफ्रिकेचा ‘सबसे बडा मॅचविनर’ वनडे मालिकेतून बाहेर (mahasports.in)






