२०२६ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे, मात्र शेजारील राष्ट्राने १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानला आपल्या या निर्णयाचा पश्चाताप करावा लागू शकतो, कारण आयसीसीने या निर्णयानंतर तातडीची आपत्कालीन बैठक बोलावली आहे.
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू सरकारच्या या निर्णयाचे पूर्ण समर्थन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शाहिद आफ्रिदीचे ताजे वक्तव्य समोर आले असून त्याने आपल्या ‘X’ अकाउंटवर लिहिले की, जे दरवाजे राजकारण उघडू शकत नाही ते क्रिकेट उघडू शकते. पाकिस्तान टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध खेळणार नाही याचे मला दुःख आहे, पण मी सरकारच्या निर्णयाचे पूर्ण समर्थन करतो. आयसीसीने आता आपल्या कृतीतून सिद्ध करावे की ते सर्व सदस्यांप्रती निष्पक्ष आहेत.
पाकिस्तान सरकारच्या या निर्णयानंतर आयसीसीने पुढील ४८ तासांत आपत्कालीन बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, या बैठकीत इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा महामुकाबला १५ फेब्रुवारीला कोलंबोच्या मैदानावर खेळवला जाणार होता. पाकिस्तान संपूर्ण स्पर्धेवर बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा होती, मात्र सरकारने केवळ भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले आहे.






