विशाखापट्टणम। आज भारत विरुद्ध श्रीलंका संघात पार पडलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात भारतीय संघाने ८ विकेट्सने विजय मिळवून ३ सामन्यांची वनडे मालिकाही जिंकली. भारताकडून शिखर धवनने शतक तर श्रेयश अय्यरने अर्धशतक केले.
श्रीलंकेने भारतासमोर ठेवलेल्या २१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने सुरवातीलाच मागील सामन्यात द्विशतक करणाऱ्या रोहित शर्माचा (७) बळी गमावला. त्याला अकिला धनंजयाने बाद केले.
त्यानंतर मात्र सलामीवीर धवन आणि तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळालेल्या श्रेयश अय्यरने शतकी भागीदारी रचून भारताचा विजयाचा मार्ग मोकळा केला. पण अय्यरला ६५ धावांवर असताना श्रीलंका कर्णधार थिसेरा परेराने झेलबाद केले. नंतर दिनेश कार्तिक(२६*) आणि धवनने आणखी पडझड होऊ न देता २१६ चे लक्ष्य सहज पार केले.
धवनने त्याचे वनडेतील १२ वे शतक पूर्ण करताना ८५ चेंडूत नाबाद १०० धावा केल्या. यात त्याने १३ चौकार आणि २ षटकार मारले. याबरोबरच त्याने आज वनडेतील ४००० धावाही पूर्ण केल्या. कमी डावात ४००० धावांचा टप्पा पार करणारा शिखर धवन दुसरा भारतीय खेळाडू ठरला. त्याने ९५ डावात ४००० धावा पूर्ण केल्या. याआधी विराटने ९२ डावात ४००० धावा पूर्ण केल्या होत्या.
तत्पूर्वी, श्रीलंकेकडून उपुल थरंगाने ९५ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याला एम एस धोनीने वेगाने स्टम्पिंग करत बाद केले. हाच या सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरला. थरंगाला सदिरा समरविक्रमाने चांगली साथ दिली त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. परंतु सदिरा ४२ धावांवर असताना युजवेंद्र चहलने झेलबाद केले.
श्रीलंकेच्या बाकी फलंदाजांना विशेष काही करता आले नाही. भारताकडून उत्कृष्ट गोलंदाजी करताना कुलदीप यादवने ४२ धावा देत ३ बळी घेतले. त्याच्या बरोबरच चहलनेही ४६ धावात ३ बळी घेतले. हार्दिक पंड्या (४९/२), भुवनेश्वर कुमार(३५/१) आणि जसप्रीत बुमराह(३९/१) यांनी देखील बळी घेतले. या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेला ४४.५ षटकातच २१५ धावांवर सर्वबाद केले.
आता २० डिसेंबरपासून भारत आणि श्रीलंकेमध्ये टी २० मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतही नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा संघाची धुरा सांभाळेल.