भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी२० सामन्यांच्या मालिकेला आज कॅनबेरा येथील मनुका ओव्हल स्टेडियमवर प्रारंभ झाला. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ११ धावांनी पराभूत करत टी२० मालिकेची विजयाने सुरुवात केली आहे. या विजयासोबतच भारताने पाकिस्तान क्रिकेट संघाच्या एका कामगिरीची बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक वेळा टी२० क्रिकेटमध्ये पराभूत करणारा भारत दुसरा संघ ठरला आहे.
अटीतटीच्या सामन्यात भारताने मिळवला रोमहर्षक विजय
वनडे मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघ टी२० मालिकेत विजयी सुरुवात करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरला. भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी करत १६१ धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. भारताकडून उपकर्णधार केएल राहुलने सर्वाधिक ५१ धावा केल्या. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रवींद्र जडेजाने तुफानी ४३ धावा ठोकत भारतीय धावसंख्येला आकार दिला.
प्रत्युत्तरात, भारतीय गोलंदाजांच्या नियंत्रित माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियन फलंदाज अडखळले. रवींद्र जडेजाचा कन्कशन सब्टीट्यूट म्हणून मैदानात आलेला फिरकीपटू युझवेंद्र चहल याने तीन व टी२० पदार्पण करणाऱ्या टी नटराजनने तीन बळी मिळवत ऑस्ट्रेलियाचा डाव १५० धावांवर रोखला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला ११ धावांनी मात देऊन, भारताने आपला सलग नववा टी२० विजय मिळवला.
भारताचा ऑस्ट्रेलियाविरूद्ध १२ वा टी२० विजय
या विजयासह भारताने ऑस्ट्रेलियावरील आपल्या बाराव्या टी२० विजयाची नोंद केली. २००७ पासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान २१ टी२० सामने खेळले गेले आहेत. त्या २१ पैकी १२ सामन्यात भारतीय संघ विजयी ठरला आहे, तर ८ सामने ऑस्ट्रेलियाने आपल्या नावे केले आहेत. एका सामन्याचा काही कारणास्तव निकाल लागू शकला नव्हता.
भारताने केली पाकिस्तानची बरोबरी
ऑस्ट्रेलियावरील बाराव्या टी२० विजयासह भारताने पाकिस्तानची बरोबरी केली आहे. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत २३ टी२० सामने खेळले आहेत. त्यातील १२ सामन्यात त्यांनी विजय नोंदवला आहे. सोबतच, नऊ सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजयश्री मिळवलेली दिसून येते. एक सामना काही कारणास्तव पूर्ण होऊ शकला नाही. भारत आणि पाकिस्तानपाठोपाठ श्रीलंका, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांनी ऑस्ट्रेलियाला प्रत्येकी आठ वेळा टी२० सामन्यात पराभूत केले आहे.
भारताला आहे पुढील सामन्यात शीर्षस्थानी येण्याची संधी
भारताला चालू मालिकेत आणखी दोन टी२० सामने खेळायचे आहेत. त्या सामन्यांमध्ये विजय मिळवत, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक टी२० विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत भारतीय संघ शीर्षस्थानी जाऊ शकतो. मालिकेतील दुसरा सामना सिडनी येथे ६ डिसेंबरला खेळवला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
कमाल लाजवाब…! जगात फक्त तीन फलंदाजांना करता आलेला विक्रम केएल राहुलच्याही नावावर
नटराजनचा ऑस्ट्रेलियात डंका, केली बुमराहच्या विक्रमाची बरोबरी
भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर नटराजनचा भावूक संदेश, म्हणाला…
ट्रेंडिंग लेख-
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ‘त्या’ पाच ऐतिहासिक खेळ्या; एकटा खेळाडू पडला आख्ख्या संघावर भारी
…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली
गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर