कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जवळपास 6 महिन्यांनंतर क्रिकेट पुन्हा सुरु झाले आहे. भारतीय खेळाडू सध्या युएई येथे आयपीएल खेळण्यात व्यस्त आहेत. आयपीएलनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. ईएसपीएन क्रिकइन्फो या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना 17 डिसेंबर रोजी खेळला जाईल.
17 डिसेंबरला ऍडलेड ओव्हल मैदानावर हा कसोटी सामना खेळला जाईल. हा दिवस-रात्र कसोटी सामना असेल आणि गुलाबी चेंडूने हा सामना खेळला जाईल. दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर सुरू होईल. दुसर्या आणि तिसर्या कसोटी सामन्यादरम्यान एक आठवडा अंतर ठेवण्याची भारतीय क्रिकेट बोर्डाची विनंती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्वीकारल्याचे दिसत आहे. तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीपासून सिडनी येथे खेळला जाईल, तर अंतिम कसोटी सामना 15 जानेवारीपासून ब्रिसबेन येथे खेळला जाईल.
कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघ तीन-तीन सामन्यांची वनडे आणि टी20 मालिका खेळणार असल्याचे समजते. वनडे सामने 26, 28 आणि 30 नोव्हेंबर रोजी ब्रिस्बेन येथे होणार असल्याची शक्यता आहे तर टी20 सामने ऍडिलेड ओव्हल येथे 4, 6 आणि 8 डिसेंबर रोजी खेळले जाईल.