भारतीय संघाने गेल्या दोन वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धही कसोटी मालिकेत २-१ ने पराभव जरी स्वीकारला असला तरी या मालिकेतील भारताची कामगिरी उत्तम झाली होती.
या दक्षिण आफ्रिका मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या जोहान्सबर्ग कसोटीत भारताने विजय मिळवला आणि यावर्षीच्या मोसमातील आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पक्के केले. त्यामुळे ३ एप्रिल २०१८ पर्यंत म्हणजेच या मोसमाच्या शेवटच्या दिवसापर्यंत भारतीय संघाचे कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान अबाधित राहणार आहे.
यासाठीच आज भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानासाठी दिली जाणारी मानाची गदा प्रदान केली जाणार आहे. त्याचबरोबर भारताला १ मिलियन डॉलर्स रकमेचे बक्षीसही मिळणार आहे.
भारतीय संघ सलग दुसऱ्या वर्षी ही मानाची गदा मिळवणार आहे. मागील वर्षीच्या मोसमातही भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी होता. तसेच ही गदा पटकावणारा विराट कोहली जगातील एकूण १० वा तर दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी २०१० आणि २०११ मध्ये एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ही गदा मिळवली होती.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका संपली तेव्हा भारताचे १२१ गुण झाले आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या दक्षिण आफ्रिकाचे ११५ गुण आहेत. त्यामुळे जरी दक्षिण आफ्रिका आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असली तरी त्यांना अव्वल स्थान मिळवण्याची संधी नाही. यामुळेच भारताचे कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान या मोसमात कायम राहणार आहे.
Watch the moment @ImVkohli was handed the ICC Test Championship Mace yesterday by Sunil Gavaskar! Will India hold it for the next year? pic.twitter.com/tLmtJZ2U3v
— ICC (@ICC) March 29, 2017