पुणे : स्कूल स्पोर्टस फेडरेशन आॅफ इंडियाच्या (एसएसएफआय) संघातील जलतरणपटू सिद्धान्त खोपडे याने ६९व्या फिसेक गेम्समध्ये तीन रौप्यपदक मिळवले. भारताच्या फुटसाल संघाने देखील स्पर्धेत ब्राँझपदक मिळवले. इटालियन कॅथलिक स्कूल स्पोर्टस फेडरेशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
इटालियन आॅलिम्पिक असोसिएशनच्या सहकार्याने आणि इंटरनॅशनल स्पोर्टस फेडरेशन फॉर कॅथलिक स्कूलच्या (एफआयएसइएस) मान्यतेने ही स्पर्धा होते. व्हेनिसमधील लिग्नानो येथे २ जुलै ते ८ जुलै दरम्यान ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत ४० सदस्यांचे पथक सहभागी झाले होते. यात भारतीय खेळाडूंचा व्हॉलीबॉल (मुली), फुटसाल (मुले), जलतरण (मुले) या खेळात सहभाग होता.
जलतरणपटू सिद्धान्त खोपडे याने २०० मीटर (२ मिनीट २४.१० से.), १०० मीटर (१ मिनीट ५.२१ से.)आणि ५० मीटर (३१.७६ से.) बॅकस्ट्रोकमध्ये रौप्यपदक मिळवले. फुटसाल संघानेही चमकदार कामगिरी करून ब्राँझपदक मिळवले. एफआयएसइसीच्या इतिहासात प्रथमच आशियाई देशाने या स्पर्धेत सांघिक आणि वैयक्तिक गटात पदक मिळवले. व्हॉलीबॉलमध्ये मुलींच्या संघानेही चमकदार कामगिरी केली. यात एसएसएफआय भारतीय व्हॉलीबॉल संघाने पोतुर्गाल आणि स्पेनच्या संघाला पराभूत केले. यानंतर फ्लँडरर्स आणि यजमान इटलीकडून भारतीय मुलींना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
६९व्या फिसेक गेम्समधील चमकदार कामगिरीबाबत एसएसएफआयचे सरचिटणीस विठ्ठल शिरगावकर यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. भारतातील खेळामधील प्रगतीसाठी हातभार लावण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. आमचे मुख्य ध्येय हे आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचे आहे, असे शिरगावकर म्हणाले.