आज (8 मार्च) महिला दिनाच्या मुहुर्तावर मेलबर्न येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात (INDWVsAUSW) आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील अंतिम सामना पार पडणार आहे. या सामन्यापुर्वी भारताची माजी कर्णधार डायना एडुल्जी (Diana Edulji) यांनी भारतीय संघाला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
यावेळी बोलताना एडुल्जी म्हणाल्या, “आज भारतीय क्रिकेटसाठी खूप मोठा दिवस आहे. मला खूप आनंद झाला आहे, कारण भारतीय महिला संघ टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणार आहे. विशेषत: भारत एकही सामना न हारता इथपर्यंत पोहोचला आहे. म्हणून माझ्या मते, संघाच्या विजयी संघसंयोजनात काहीही छेडछाड होऊ नये.’
‘संघ व्यवस्थापनाने भारताची फलंदाज वेदा कृष्णमूर्थिच्या (Veda Krishnamurthy) जागी बंगालची रिचा घोष (Richa Ghosh) हिला पहिल्या 11मध्ये घेण्याची शक्यता वर्तवली आहे. पण, मला वाटते की संघात कसलाही बदल करू नये.”
“अंतिम सामन्यात भारतीय संघाने 4 फिरकीपटू गोलंदाज पूनम यादव (Poonam Yadav), राधा यादव (Radha Yadav), राजेश्वरी गायकवाड (Rajeshwari Gayakwad) आणि दिप्ती शर्मा (Dipti Sharma) तर 1 वेगवान गोलंदाज शिखा पांडे (Shikha Pandey) यांच्यासह उतरावे. कारण, याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणता चांगला पर्याय नाही. शिखाबरोबर संभवत: दिप्तीने गोलंदाजीची सुरुवात करावी. कारण यांची जोडी संपूर्ण विश्वचषकात भारताची मोठी ताकद म्हणून समोर आली आहे.” असेही त्या पुढे म्हणाल्या.
तसेच एडुल्जी म्हणाल्या की, “भारताची अजून एक मजबूत बाजू आहे ती अशी की भारतीय संघ पॉवर प्लेमध्ये दमदार खेळत आहे. भारताची युवा फलंदाज शेफाली वर्मामुळे (Shefali Verma) भारताने पॉवर प्लेमध्ये खूप धावा केल्या आहेत. भारताची अनुभवी फलंदाज स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) आणि कर्णधार हरमनप्रीत कौरला (Harmanpreet Kaur) अंतिम सामन्यात मोठ्या धावा कराव्याच लागणार आहेत.”
शेफाली आणि स्म्रीतीची प्रशंसा करत एडुल्जी म्हणाल्या, “भारताला अंतिम सामन्यापुर्वी एक मानसिक फायदाही मिळाला आहे. तो असा की ऑस्ट्रेलिया संघातील वेगवान गोलंदाज मेगन शटने म्हटले आहे की, तिला भारताविरुद्ध खेळण्याचा तिरस्कार वाटतो. शेफाली आणि स्र्मीतीने मला खूप सतवले आहे आणि मला पॉवर प्लेमध्ये तर भारतीय सलामीवीर फलंदाजांच्या विरुद्ध अजिबात गोलंदाजी करायची नाही. पण, ही ऑस्ट्रेलिया संघाचे एखादे षडयंत्रही असू शकते.”
“भारताची गोलंदाजी खूप चांगली आहे. फलंदाजीबाबत मला हे सांगायचे आहे की, जर फलंदाजांनी 150हून अधिक धावा केल्या तर गोलंदाज आपल्याला नक्की विजेतेपद मिळवून देतील. शेफाली व्यतिरिक्त स्म्रीती, हरमनप्रीत, जेमिमाह रोड्रिगेजला चांगल्या धावा कराव्या लागतील आणि यापैकी कुणाला तरी शेवटपर्यंत टिकून रहावे लागेल. धावा करण्याचा तान केवळ शेफालीवरती पडू देऊ नये, “असेही त्या म्हणाल्या.





