दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रविवारी (13 सप्टेंबर) महिला आशिया चषक 2026 चा अंतिम सामना खेळला गेला. यामध्ये भारताने श्रीलंकेचा 72 धावांनी पराभव केला आणि आठव्यांदा आशिया चषक जिंकण्याची कामगिरी केली. भारतीय महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या एकदिवसीय फॉरमॅटमधील सर्व चार विजेतेपद जिंकली आहेत. आता त्यांनी चार टी20 आशिया चषक जिंकण्याची कामगिरी केली.
भारताने 2004, 2005/06, 2006 आणि 2008 मध्ये एकदिवसीय आशिया चषकाचे विजेतेपद जिंकले आहे. टी20 मध्ये 2012, 2016, 2022 आणि आता 2026 मध्ये आशिया चषक जिंकत इतिहास रचला आहे.
सामन्याची स्थिती
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तिचा हा निर्णय भारतीय फलंदाजांनी सार्थ ठरवला आणि 20 षटकांत 5 विकेट्स गमावत 183 धावसंख्या उभारली. यामध्ये स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी संघाला नेहमीप्रमाणे उत्तम सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 77 चेंडूंत 129 धावांची भागीदारी केली. शफालीने 39 चेंडूंत 9 चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने 68 धावा केल्या. स्मृतीने तेवढ्याच चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या सहाय्याने 59 धावा केल्या.
स्मृती आणि शफाली बाद झाल्यानंतर कोणत्याही भारतीय फलंदाजाने 20 पेक्षा अधिक धावा केल्या नाहीत. विकेटकीपर-फलंदाज ऋचा घोषने 17 धावा, जी कमलिनीने 15 आणि हरमनप्रीतने 14 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यास उतरलेल्या श्रीलंकेची सुरूवात अडखळत झाली. त्यांनी पहिल्याच षटकात विकेट गमावली. ईमेशा दुलाणी चार चेंडूत 4 धावा करत बाद झाली. तिला क्रांती गौडने त्रिफळाचीत केले. त्यानंतर त्यांची कर्णधार चमारी अट्टापट्टू आणि विशमी गुणारत्ने यांनी संघाचा डाव सांभाळला. दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली होती, मात्र दीप्ती शर्माने ही जोडी फोडली. तिने एकाच षटकात दोघांच्या विकेट्स घेतल्या.
श्रीलंकेच्या केवळ चमारी (36), विशमी (20) आणि नीलक्षीका सिल्वा (22) यांनाच दुहेरी धावसंख्या करता आल्या, बाकी श्रीलंकन फलंदाजांनी निराशा केली. भारताकडून श्री चरणी आणि दीप्तीने प्रभावी गोलंदाजी केली. चरणीने 4 षटकांत 20 धावा देत 4 विकेट्स दिल्या. याबरोबरच तिने एक षटक निर्धावही टाकले. दिप्तीने 4 षटकांत 19 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तसेच शफाली, क्रांती आणि प्रेमा रावत यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत भारत आणि श्रीलंका अपराजित होते. उपांत्य फेरीत भारताने बांगलादेशला आणि श्रीलंकेने पाकिस्तानला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
याआधी भारत आणि श्रीलंका 2024च्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भिडले होते. तेव्हा श्रीलंका जिंकला होता. यंदा मात्र भारताने त्या पराभवाचा बदला घेतला आहे. श्रीलंकेचा संघ 20 षटकांत 111 धावसंख्येपर्यंतच मजल मारू शकला. यादरम्यान त्यांनी सर्व विकेट्सही गमावल्या होत्या. (India showed their dominance won eighth Women’s Asia Cup title, defeating Sri Lanka in final 2026)




