टी20 विश्वचषक आता अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. अशा स्थितीत आयपीएल 2024 मध्ये अनेक खेळाडूंच्या शानदार फॉर्ममुळे निवडकर्त्यांसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.
आता पीटीआयचा एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये आगामी विश्वचषकासाठी 20 खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. यापैकी 15 खेळाडूंचा संघ निवडला जाऊ शकतो आणि इतर 5 खेळाडू राखीव म्हणून ठेवले जातील. या यादीत चालू आयपीएलमध्ये तुफान फार्मात असलेल्या रियान परागचं नाव नाही. मात्र आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत फारशी चांगली कामगिरी न करू शकलेल्या यशस्वी जयस्वाल, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांचं नाव आहे.
वरच्या फळीतील फलंदाजीबद्दल बोलायचं झाल्यास, या लिस्टमध्ये रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल आणि विराट कोहली यांचं नाव आहे. रिपोर्टनुसार, रोहित शर्मा आणि विराट कोहली टी 20 विश्वचषकात सलामीला येऊ शकतात. तर मधल्या फळीत फलंदाजीसाठी सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह, ऋषभ पंत, केएल राहुल आणि संजू सॅमसन यांची नावं पुढे आली आहेत.
अष्टपैलू खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांची नावं आहेत. तर स्पिन गोलंदाजीसाठी कुलदीप यादव, रवी बिश्नोई आणि युजवेंद्र चहल यांच्या रूपात ३ पर्याय आहेत. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचं स्थान जवळपास निश्चित आहे. त्याच्यासह मोहम्मद सिराज, आवेश खान आणि अर्शदीप सिंग वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळू शकतात.
या यादीनुसार, हैदराबाद विरुद्ध 83 धावांची शानदार खेळी करणाऱ्या दिनेश कार्तिकला विश्वचषकाच्या संघातून दुर्लक्षित करण्यात आलं आहे. शिवाय या हंगामात सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या युवा मयंक यादवला संधी दिली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र भारताकडून पदार्पण करण्यासाठी त्याला आणखी वाट पाहावी लागू शकते. आयपीएलच्या या हंगामात मयंकनं ताशी 156.7 किमी वेगानं चेंडू टाकला आहे. तसेच अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनलाही संघात स्थान नाही.
टी20 विश्वचषकासाठी 20 खेळाडूंची यादी : रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, केएल राहुल, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, आवेश खान
महत्त्वाच्या बातम्या –
दिल्लीविरुद्ध आपल्याच जाळ्यात अडकली गुजरात टायटन्स, संथ खेळपट्टीवर अवघ्या 89 धावांत ऑलआऊट
या लहान मुलीची बॉलिंग ॲक्शन पाहून सचिनला आठवण आली दिग्गज गोलंदाजाची; म्हणाला, “तुझं करिअर…”
‘थाला’ पुढचं आयपीएल खेळणार की नाही? ‘चिन्नाथाला’नं एकाच शब्दात उत्तर दिलं, म्हणाला…