भारतीय संघ डिसेंबर २०२१-जानेवारी २०२२ या दोन महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होता. या दौऱ्याची एकदिवसीय मालिकेने सांगता झाली. तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना केपटाऊन येथे पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला ४ धावांनी पराभूत केले. त्यामुळे भारतावर एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामने गमावण्याची नामुष्की ओढावली. दक्षिण आफ्रिकेने ३-० ने मालिका नावावर केली आहे. असे असतानाच तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील एका चूकीमुळे आयसीसीने भारतावर कारवाई देखील केली आहे.
केपटाऊनमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारताला निर्धारित वेळेपेक्षा २ षटके पूर्ण करण्यासाठी उशीर झाला. त्याचमुळे आयसीसीने षटकांची गती कमी राखल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाला सामना शुल्काच्या ४० टक्के दंड ठोठवण्यात आला आहे.
मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांनी सांगितले की, भारतीय संघ सामन्यादरम्यान वेळेच्या दोन षटके मागे चालला होता. यानंतर भारताला दंड ठोठवण्यात आला आहे. आयसीसीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, “खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या आचारसंहितेनुसार नियम क्रमांक २.२२ अंतर्गत निर्धारित वेळेत एक षटक मागे राहिल्याबद्दल खेळाडूंना २० टक्के दंड आकारला जातो. या अंतर्गत भारतीय संघाला सामना फीच्या ४० टक्के दंड ठोठावण्यात येत आहे.”
भारताचा कर्णधार केएल राहुलने मॅच रेफरीच्या समोर चूक मान्य केली आहे. मैदानावरील पंच मरे इरास्मस आणि बोंगानी येले, तिसरे पंच अल्लाउद्दीन पालेकर आणि चौठे पंच ऍड्रियन होल्डस्टॉक यांनी षटकांची गती कमी राखल्याबद्दल तक्रार केली होती. याआधी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये षटकांची गती कमी राखल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला दंड ठोठावण्यात आला होता. टेंबा बवुमाच्या नेतृत्त्वाखालील दक्षिण आफ्रिकेला सामना शुल्काच्या २० टक्के दंड ठोठावण्यात आला.
अधिक वाचा – “जर रोहित फिट असेल, तर त्याला कसोटी संघाचा पूर्णवेळ कर्णधार का बनवले जाऊ शकत नाही?”
केपटाउनमध्ये पार पडलेल्या या सामन्यात भारताचा प्रभारी कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने २८७ धावा केल्या. क्विंटन डिकॉकने १२४ धावांची शानदार खेळी केली. रस्सी वॅन डर ड्युसेनने ५२ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा संघ ४९.५ षटकांत सर्वबाद झाला. भारताकडून शानदार गोलंदाजी करताना प्रसिद्ध कृष्णाने तीन, दीपक चाहर आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. सहाव्या एकदिवसीय शतकासह क्विंटन डीकॉकने भारताविरुद्ध सर्वात जास्त शतक लगावणारा दक्षिण अफ्रिकेचा खेळाडू एबी डिविलियर्सच्या विक्रमाची बरोबरी केली.
व्हिडिओ पाहा – नेमका जॉन राईट आणि सेहवाग मध्ये वाद तरी काय होता?
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून शिखर धवनने ६१, तर माजी कर्णधार विराट कोहलीने ६५ धावा केल्या आणि दीपक चहरने ५४ धावा करत भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण, भारतीय संघ ४९.२ षटकांत २८३ धावांवर सर्वबाद झाला. या मालिकेत भारत दुसऱ्यांदा लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयशी ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘लखनऊ सुपरजायंट्स’ नाव पाहाताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; युजर्सने लावला पुण्याच्या टीमची संबंध
आठवण मोहिंदर अमरनाथ यांनी सहा टाके घातल्यानंतरही केलेल्या ‘त्या’ झुंजार खेळीची
वाढदिवस विशेष: टीम इंडियाची माॅडर्न एराची भिंत, चेतेश्वर पुजारा!





