शुक्रवार, २९ जूनला दुबई कबड्डी मास्टर्स स्पर्धेत पार पडलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विश्वविजेत्या भारतीय संघाने दक्षिण कोरियाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
या सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा ३६-२० अशा फरकाने पराभव केला. कर्णधार अजय ठाकूरने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत या विजयात मोलाची भूमिका निभावली.
संपूर्ण स्पर्धेत एकहाती वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय संघाला या सामन्यात प्रथमच विरोधकांकडून कडवी टक्कर मिळाली.
दक्षिण कोरियाने या सामन्यात चिवट खेळ करत भारतीय संघाला जेरीस आणले होते.
दक्षिण कोरियाच्या जांग कून लीने आक्रमक चढाई करत पहिल्या आठ मिनिटात दक्षिण कोरियाल ७-३ अशी आघाडी मिळवून दिली होती.
सामन्याच्या ११ व्या मिनिटाला कर्णधार अजय ठाकूर आणि बचावपटू मोहित चिल्लरच्या खेळाने सामना ७-७ अशा बरोबरीत आणण्यास भारतीय संघाला यश आले.
त्यानंतर मोनू गोयत आणि अजय ठाकूरच्या आक्रमक चढाईने १५ मिनिटाला भारतीय संघाने १३-८ अशी आघाडी मिळवत सामन्याचे पारडे आपल्याकडे झुकवले.
त्यानंतर भारतीय संघाने पहिल्या हाफमध्ये आपली आघाडी १७-१० अशी वाढवली.
अनुभवी भारतीय संघाने यानंतर दक्षिण कोरियाला सामन्यात पुन्हा पुनरागमन करण्याची एकही संधी दिली नाही. पूर्ण वेळेत भारतीय संघाने दक्षिण कोरियाला ३६-२० अशा फरकाने पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली.
इराणने उडवला पाक संघाचा धुव्वा
दुसरीकडे बलाढ्य इराणने पाकिस्तानचा उपांत्य फेरीच्या सामन्यात ४२-२१ अशा फरकाने पराभव करत अंतिम फेरीतले आपले स्थान पक्के केले.
या स्पर्धेत आपल्या स्टार खेळाडूंशिवाय उतरलेल्या इराणने अपेक्षितपणे पाकिस्तानचा धुव्वा उडवला.
इराणचा कर्णधार नबीबक्श आणि मोहम्मद मोघसोदूल यांच्या आक्रमक चढाईने इराणने पाकिस्तानला या सामन्यात वरचढ होण्याची एकही संधी दिली नाही.
तर बचाव फळीत इराणच्या मोहम्मद मलकने उत्कृष्ट खेळ करत पाकिस्तानी चढाईपटूंचे कंबरडे मोडले.
संपूर्ण सामन्यात इराणने पाकिस्तानवर वर्चस्व गाजवत सामना ४२-२१ अशा फरकाने आपल्या खिशात टाकला.
आता अंतिम सामन्यात इरणला विश्विविजेत्या भारतीय संघाशी शनिवार, ३० जून रोजी लढत द्यावी लागणार आहे.
कधी होणार अंतिम सामना?
भारत विरुद्ध इराण शनिवार, ३० जून रात्री ८ वाजता.
महत्त्वाच्या बातम्या:
-टॉप 5: दुसऱ्या टी20 मध्ये भारतीय संघाने केले हे खास विक्रम
-विराट कोहलीच्या बाबतीत असे दुसऱ्यांदाच घडले!