आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी 24 जुलै आशिया चषक 2018 चे संपूर्ण वेळापत्रक जाहिर केले आहे. ही द्विवार्षिक स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये 15 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे.
या स्पर्धेत भारतीय संघाला सलग दोन दिवस दोन सामने खेळायला लागणार आहे. टीम इंडिया १९ सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध तर १८ सप्टेंबरला पात्रता फेरीतून आलेल्या संघाविरुद्ध सामना खेळणार आहे.
त्यामुळे संघाला कोणतीही विश्रांती मिळणार नाही. केवळ काही तासांत भारतीय संघाला दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात यावे लागणार आहे.
या स्पर्धेची सुरुवात बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सलामीच्या सामन्याने दुबईत होईल. आशिया चषकाच्या मुख्य स्पर्धेसाठी भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे थेट पात्र ठरले आहेत.
तसेच संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर,ओमान, नेपाळ, मलेशिया आणि हाँग काँग या संघांमध्ये पात्रता फेरी रंगेल. या पात्रता फेरीतून एक संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र होईल.
मुख्य स्पर्धेत अ गटात भारत, पाकिस्तान आणि पात्रता फेरीतून पात्र ठरलेला संघ खेळेल, तर ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे.
दोन्ही संघातील प्रत्येकी अव्वल दोन संघ सुपर फोर फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर 28 सप्टेंबरला दुबईत या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडेल.
या बरोबरच साखळी फेरीत गतविजेता भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी एकाच गटात असल्याने 19 सप्टेंबरला साखळी फेरीत ते आमने-सामने येतील.
असे आहे आशिया चषकाचे वेळापत्रक:
साखळी फेरी-
15 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका – दुबई
16 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध पात्रता फेरीतून पात्र ठरलेला संघ – दुबई
17 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान – अबु धाबी
18 सप्टेंबर – भारत विरुद्ध पात्रता फेरीतून पात्र ठरलेला संघ – दुबई
1 9 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान – दुबई
20 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान – अबु धाबी
सुपर फोर –
21 सप्टेंबर – गट अ विजेता विरुद्ध ब गट उपविजेता – दुबई
21 सप्टेंबर – गट ब विजेता विरुद्ध अ गट उपविजेता – अबु धाबी
23 सप्टेंबर – गट अ विजेता विरुद्ध अ गट उपविजेता – दुबई
23 सप्टेंबर – ब गट विजेता विरुद्ध ब गट उपविजेता – अबु धाबी
25 सप्टेंबर – गट अ विजेता विरुद्ध गट ब विजेता – दुबई
26 सप्टेंबर – अ गट उपविजेता विरुद्ध ब गट उपविजेता – अबु धाबी
अंतिम सामना-
28 सप्टेंबर – आशिया चषक 2018 अंतिम सामना – दुबई
महत्त्वाच्या बातम्या:
–माझ्या आयुष्यासाठी सचिन तेंडुलकरला फलंदाजीसाठी निवडेल- राहुल द्रविड
–मला आॅलिंपिंक गोल्ड मेडल जिंकायला आवडलं असतं – राहुल द्रविड
–एमएस धोनी आणि धडक फेम इशान खट्टर झाले फुटबॉल सामन्यात सैराट