भारताच्या अंडर-19 संघानं तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 7 धावांनी पराभव करत रोमांचक विजयाची नोंद केली. यासह भारतानं 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत कांगारूंचा क्लीन स्वीप करून 30 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे.
भारतानं पहिला सामना 7 गडी राखून आणि दुसरा सामना 9 विकेट्सच्या मोठ्या फरकानं जिंकला होता. शेवटच्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियानं प्रथम फलंदाजी करताना 324 धावा केल्या. परंतु लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला निर्धारित 50 षटकात केवळ 317 धावाच करता आल्या.
भारताकडून रुद्र पटेलनं 77 धावा केल्या आणि कर्णधार मोहम्मद अमाननं 71 धावांचं योगदान दिलं. त्यांच्याशिवाय अखेरच्या षटकांमध्ये हार्दिक राजनं 18 चेंडूत 30 धावांची आणि चेतन शतमानं 9 चेंडूत 18 धावांची खेळी खेळून टीम इंडियाची धावसंख्या 300 च्या पुढे नेली. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियन कर्णधार ऑलिव्हर पीकनं 111 धावांची उत्कृष्ट शतकी खेळी केली. त्यानं स्टीव्हन होगनसोबत 180 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. होगननं 104 धावा केल्या. मात्र ऑलिव्हर आणि होगन यांची शतकी खेळीही ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत नेऊ शकली नाही.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंडर-19 स्तरावरील एकदिवसीय सामन्यातील एकूण सर्वोच्च धावसंख्या 1994 मध्ये बनली होती. 1994 मध्ये ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर आला होता तेव्हा वडोदरा येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं 317 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला केवळ 271 धावाच करता आल्या. पण दोन्ही संघांची एकूण धावसंख्या 588 धावा होती, जी भारत-ऑस्ट्रेलिया अंडर-19 सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या होती.
चालू मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना पुद्दुचेरीत खेळला गेला. या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करताना 324 धावा केल्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियन संघानं 317 धावा केल्या. अशाप्रकारे एकूण धावा 641 झाल्या, जो एक नवीन विक्रम आहे.
हेही वाचा –
श्रीलंकेच्या फलंदाजाचा कसोटीमध्ये भीम पराक्रम! असं करणारा जगातील पहिलाच खेळाडू
21व्या शतकातील भारताची सर्वोत्तम कसोटी इलेव्हन, रोहित-धोनी सारख्या अनेक दिग्गजांना मिळाली नाही जागा!
रिकी पाँटिंग येताच पंजाब किंग्जच्या दोन खास सदस्यांचा रामराम, एका भारतीयाचाही समावेश