चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय अंडर 19 संघानं ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 संघाचा अवघ्या तीन दिवसांत पराभव केला. टीम इंडियानं हा सामना एक डाव आणि 120 धावांनी जिंकून दोन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली.
भारतानं पहिल्या डावात 420 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाला दोन्ही डावात चांगली कामगिरी करता आली नाही. ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात 277 धावाच करू शकला, ज्यानंतर भारतानं त्यांना फॉलोऑन दिला. यानंतर दुसऱ्या डावात संपूर्ण संघ केवळ 95 धावाच करू शकला. अशाप्रकारे भारतानं या सामन्यात मोठा विजय मिळवला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघासाठी सलामीच्या फलंदाजांनी फारसं काही केलं नाही. विहान मल्होत्रा 10 धावा करून बाद झाला तर वैभव सूर्यवंशी 3 धावा करून बाद झाला. तिसऱ्या विकेटसाठी नित्या पांड्या आणि केपी कार्तिकेय यांच्यात शतकी भागीदारी झाली. नित्यानं 135 चेंडूत 94 धावांची तर कार्तिकेयनं 99 चेंडूत 71 धावांची खेळी केली. निखिल कुमारनं 61 आणि कर्णधार सोहम पटवर्धननं 63 धावांचं योगदान दिलं.
यानंतर हरवंश पनगालियाची शानदार फलंदाजी पाहायला मिळाली. त्यानं शतक झळकावत 117 धावांची खेळी केली. मोहम्मद अनननं 26 आणि समर्थ नागराजनं 20 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून चार गोलंदाजांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या डावात फक्त दोन फलंदाजांनी 50 पेक्षा अधिक धावा केल्या. याशिवाय इतर फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. कर्णधार ऑलिव्हर पीकनं जबरदस्त खेळी करत 199 चेंडूत 117 धावा केल्या. ॲलेक्स ली यंगनं 66 धावांचे योगदान दिलं. भारताकडून मोहम्मद अनन आणि अनमोलजीत सिंग यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची कामगिरी आणखीनच खराब झाली. डावात केवळ तीनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. स्टीव्हन होगननं सर्वाधिक 29 धावा केल्या. गोलंदाजीत भारताकडून अनमोलजीत सिंगनं सर्वाधिक 5 बळी घेतले.
हेही वाचा –
भारताच्या मोठ्या विजयानं बदललं संपूर्ण चित्र, आता सेमीफायनलचं समीकरण जाणून घ्या
“यात काही शंका नाही…”, बांगलादेशी खेळाडूनं कबूल केलं भारताचं वर्चस्व
बाबर आझमची कसोटी कारकीर्द संपली? मुलतानच्या पाटा खेळपट्टीवरही धावा निघेना