अॅडलेड। भारताचा आॅस्ट्रेलिया विरुद्ध अॅडलेड ओव्हल मैदानावर पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात चौथ्या दिवसाखेर(9 डिसेंबर) आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 49 षटकात 4 बाद 104 धावा केल्या आहेत. त्यांना विजयासाठी अजूनही 219 धावांची आवश्यकता आहे.
आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात भारताने विजयासाठी दिलेल्या 323 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दुसऱ्या डावाची सावध सुरुवात केली होती. मात्र चौथ्या दिवसाचे दुसरे सत्र संपण्याआधी 12 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने अॅरॉन फिंचला बाद करत आॅस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला.
त्यानंतर तिसऱ्या सत्रात काहीवेळाच पदार्पणाचा सामना खेळणारा मार्क्यूस हॅरिसला मोहम्मद शमीने बाद केले. त्याचा यष्ट्रीरक्षक रिषभ पंतने अचून झेल घेतला. हॅरिसने 26 धावांची खेळी केली.
त्याच्या पाठोपाठ काही वेळातच आॅस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज उस्मान ख्वाजाने अश्विनच्या गोलंदाजीवर चूकीटचा फटका मारला. त्यामुळे चेंडू कव्हरच्या बाजूला वर उंच उडाला आणि रोहितने कोणतीही चूक न करता झेल टिपला. ख्वाजाला 8 धावाच करता आल्या.
ख्वाजा बाद झाल्यानंतर पिटर हँड्सकॉम्ब आणि शॉन मार्शने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण 24 धावांच्या भागीदारीनंतर शमीने पिटर हँड्सकॉम्बला 14 धावांवर असताना बाद केले. त्याचा झेल चेतेश्वर पुजाराने घेतला.
त्यामुळे चौथ्या दिवसाखेर मार्श 31 धावांवर आणि पहिल्या डावात अर्धशतक करणारा ट्रेविस हेड 11 धावांवर नाबाद आहेत.
तत्पूर्वी भारताचा दुसरा डाव 307 धावांवर संपुष्टात आला आहे. भारताकडून अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने अर्धशतकी खेळी केल्या आहेत.
भारताने चौथ्या दिवशी 3 बाद 151 धावांसंख्येवरुन पुढे खेळायला सुरुवात केली. पुजारा आणि रहाणे यांनी दिवसाच्या सुरुवातीला आॅस्ट्रेलियन गोलंदाजांना यश मिळू न देता 87 धावांची अर्धशतकी भागीदारीही रचली. पण आॅस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने पुजाराला 71 धावांवर असताना बाद केले.
त्यानंतर लगेचच लायनने रोहित शर्माचीही विकेट मिळवली. रोहितला फक्त 1 धावच करता आली. यानंतर काहीवेळाने आक्रमक खेळण्याचा नादात रिषभ पंतनेही 28 धावांवर लायनच्याच गोलंदाजीवर विकेट गमावली.
पंत बाद झाल्यावर काहीवेळात अश्विनही 5 धावांवर बाद झाला. त्याच्या पुढच्याच षटकात लायनने लागोपाठच्या चेंडूंवर रहाणे आणि मोहम्मद शमी यांची विकेट घेतली. पण तत्पूर्वी रहाणेने 70 धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. यानंतर अखेर मिशेल स्टार्कने इशांत शर्माला बाद करत भारताचा डाव 307 धावांवर संपुष्टात आणला.
त्यामुळे भारताने आॅस्ट्रेलियाला पहिल्या डावातील 15 धावांच्या आघाडीसह विजयासाठी 323 धावांचे लक्ष्य दिले आहे.
आॅस्ट्रेलियाकडून या डावात नॅथन लायनने सर्वाधिक 122 धावांत 6 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तसेच मिशेल स्टार्कने 40 धावांत 3 आणि जोश हेजलवूडने 43 धावांत 1 विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या:
–असा भीमपराक्रम करणारा विराट कोहली जगातील पहिलाच क्रिकेटपटू
–या कारणामुळे आॅस्ट्रेलियन संघाने आज हाताला बांधली काळी पट्टी
–हा आॅस्ट्रेलियन गोलंदाज पडतोय भारतीय फलंदाजांना भारी
–आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: आर अश्विनने १२ षटकांच्या आतच आॅस्ट्रेलियाला दिला पहिला धक्का