भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट सामन्यांच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियातील खेळाडूंना शाब्दिक बाण सोडताना आपण नेहमीच पाहिलं आहे. यंदाच्या भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरु होण्याआधीही वेगळे काही घडले नाही. आत्ताही या दौऱ्यातील सामने सुरु होण्याआधी शाब्दिकवार सुरु झाले आहेत. या मालिकेच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक्स कॅरीने संघाच्या सामर्थ्याबद्दल भाष्य केले आहे.
ऑस्ट्रेलियात उत्तम आणि दर्जेदार खेळाडू
ऍलेक्स कॅरीने हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपात्राला दिलेल्या मुलखातीत सांगितले की “बुमराह आणि शमी किती चांगले गोलंदाज आहेत हे आम्हाला ठाऊक आहे, परंतु ऑस्ट्रेलिया संघातसुद्धा उत्तम आणि दर्जेदार खेळाडू आहेत.”
भारताकडे बुमराह, शमी तर आमच्याकडे कमिन्स, स्टार्क..
भारतीय गोलंदाजांच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचीही गोलंदाजी चांगल्या दर्जाची आहे हे सांगताना कॅरी म्हणाला की, “ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेविड वॉर्नर आणि अॅरॉन फिंच यांना भारतीय गोलंदाजांविरूद्ध चांगली कामगिरी करण्यात यश आले आहे. आपण बुमराह, शमी, चहल आणि जडेजा या सर्व भारतीय गोलंदाजांबद्दल चर्चा करतो, पण पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, या ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची कामगिरी पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. याव्यतिरिक्त संघात अॅडम झांपा आणि जोश हेजलवुड हेदेखील आहेत.”
केएल राहुल, विराट यांची विकेट महत्वाची
भारताचा स्टार फलंदाज केएल राहुलबद्दल बोलताना कॅरी म्हणाला की, “केएल राहुल विरुद्ध बरेच सामने खेळलो आहे. तो आक्रमक फलंदाज आहे. मला वाटते या क्षणी या भारतीय संघात बरेच चांगले खेळाडू आहेत. केएल राहुल आणि विराट कोहली या दोघांचीही विकेट खूप महत्वाची असेल.”
संपूर्ण भारतीय संघच आक्रमक
“आपण मागील काही वनडे सामन्यांत श्रेयस अय्यरचा फॉर्म पहिलाच आहे. भविष्यात शुबमन गिल आणि पृथ्वी शॉ हे दोन युवा खेळाडूही आपल्याला खेळताना दिसतील. या संघात फक्त एकच खेळाडू महत्वाचा नाही, तर संपूर्ण संघाच आक्रमक शैलीचा आहे,” असेही पुढे बोलताना कॅरी म्हणाला.
भारतीय संघाला रोखण्यासाठी उत्सुक
हिंदुस्तान टाइम्सच्या प्रतिनिधीने कॅरीला प्रश्न विचारला की मर्यादित षटकांच्या मालिकेत भारत ऑस्ट्रेलियावर वरचढ ठरेल का?
कॅरीने कोणताही विचार न करता अगदी मुत्सद्दीपणे उत्तर दिले. तो म्हणाला की, “आम्ही आगामी मालिकेत भारतीय संघाला रोखण्यासाठी उत्सुक आहोत. भूतकाळात या दोन संघात मर्यादित षटकांच्या मालिकेसह कसोटी क्रिकेटचेही चांगले सामने पाहायला मिळाले आहेत. आम्ही खेळावर खूप मेहनत करत आहोत, आगामी मालिकेत आम्ही खेळाचा आनंद घेऊ.”
महत्त्वाच्या बातम्या –
एकेकाळी मैदानावर कापत होता गवत, आता भारताविरुद्ध मोठे विक्रम करण्यासाठी सज्ज
आयसीसीचा मोठा निर्णय! १५ वर्षांखालील क्रिकेटर्स खेळू शकणार नाहीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट
मोठी बातमी! श्रीलंकेचा ‘हा’ क्रिकेटपटू अडकला फिक्सिंगच्या जाळ्यात, आयसीसीकडून कडक कारवाई