भारतीय संघाने वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची सुरुवात दिमाखात केली. भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाचा 6 विकेट्सने पराभव केला. भारताच्या विजयात विराट कोहली आणि केएल राहुल यांनी सिंहाचा वाटा उचलला. मात्र, त्यांना शतक करता आले नाही. या विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने खेळाडूंचे कौतुक तर केलेच, पण त्यासोबतच त्याने असे काही विधान केले, ज्यामुळे त्याची चर्चा होत आहे.
रोहित शर्माची प्रतिक्रिया
भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने सामन्यानंतर म्हटले की, “अव्वलस्थानी येऊन चांगले वाटत आहे. आमच्यासाठी स्पर्धेची सुरुवात करण्यासाठी हा एक शानदार सामना होता. क्षेत्ररक्षणात आज आम्ही सर्वांचे प्रयत्न पाहिले. अशाप्रकारची स्थिती कठीण असते. आमच्या गोलंदाजांनी परिस्थितीचा चांगला वापर केला आणि आम्हाला माहिती होते की, प्रत्येकाला मदत मिळेल. इतकेच नाही, तर वेगवान गोलंदाजांनाही यश मिळाले, फिरकीपटूंनी चांगल्या क्षेत्रात गोलंदाजी केली आणि एकूणच हा शानदार प्रयत्न होता.”
सुरुवातीलाच पडल्या तीन विकेट्स
भारतीय संघाने पहिल्या षटकातच ईशान किशनची विकेट गमावली होती. त्यानंतर दुसऱ्या षटकात रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनीही तंबूचा रस्ता पकडला. यावेळी भारतीय संघाची धावसंख्या 3 बाद 2 धावा अशी होती. यावर बोलताना रोहित म्हणाला, “मी घाबरलो होतो. तुम्हाला तुमच्या डावाची सुरुवात अशी करू वाटणार नाही. याचे श्रेय ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना जाते. कारण, त्यांनी चांगल्या क्षेत्रात गोलंदाजी केली.”
‘या’ खेळाडूंवर उधळली स्तुतीसुमने
भारतीय खेळाडूंचे कौतुक करताना रोहित म्हणाला की, “जेव्हा तुमच्याकडे तशाप्रकारचे आव्हान असते, तेव्हा तुम्ही पॉवरप्लेमध्ये शक्य तितक्या धावा करू इच्छिता. मात्र, याचे श्रेय विराट कोहली आणि केएल राहुल यांना जाते. त्यांनी आव्हानाचा पाठलाग कसा केला? एक संघाच्या रूपात आमच्यासाठी हे आव्हान असेल. वेगवेगळ्या परिस्थितीत जाणे आणि स्वत:ला त्यानुसार जुळवून घेणे, जो परिस्थितीला अनुकूल असेल, त्याने येऊन काम केले पाहिजे. चेन्नई कधीच निराश करत नाही. ते क्रिकेटवर प्रेम करतात. त्यांच्यासाठी त्या उकाड्यात बसणे आणि बाहेर येऊन संघाचा जयजयकार करणे, खूप काही सांगून जातो.”
विराट-राहुल चमकले
या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 49.3 षटकात सर्व विकेट्स गमावत 199 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने 41.2 षटकात 4 बाद 201 धावा करून सामना 6 विकेट्सने खिशात घातला. या विजयात विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल (KL Rahul) यांचे मोलाचे योगदान होते. विराटने 116 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 85 धावा केल्या, तर राहुलने 115 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 97 धावांचे योगदान दिले. तसेच, हार्दिक पंड्या 11 धावांवर नाबाद राहिला. (india vs australia captain Rohit Sharma Reaction after india win world cup 2023 1st match)
हेही वाचा-
विजयामुळे न्यूझीलंड कॉन्फिडेन्ट, तर पराभवाचं तोंड पाहिलेला नेदरलँड; NZ vs NED सामन्यात कोणाचं पारडं जड? वाचा
‘शेवटच्या चेंडूवर षटकार मारायचा नव्हता’, विजयानंतर राहुलने स्वतः केले मान्य