भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvsAUS) टी20 मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (20 सप्टेंबर) खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. या महत्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी कसून मेहनत केली आहे. ही मालिका सुरू होण्याआधी भारताकडून कोणती सलामीजोडी मैदानात उतरणार या चर्चेला उधान आले होते. विराट कोहली याने आशिया चषकात सलामीला येत शतक केल्याने तो पुन्हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलामीला खेळणार का हे प्रश्न चाहते विचारत होते, याचे स्पष्टीकरण भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने दिले आहे.
आशिया चषकात अफगाणिस्तान विरुद्ध शतक करणाऱ्या विराट कोहली (Virat Kohli) याने जवळपास तीन वर्षानंतर आंतरराष्ट्रीय शतक केले. त्याचे हे टी20तील पहिले तर 71वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले. त्यातच केएल राहुल याचा फॉर्म निराशाजनक ठरल्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धही विराटच सलामीला येणार का हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. मात्र भारताचा कर्णधार-सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने राहुल हाच सलामीला येणार हे स्पष्ट केले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेआधी झालेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता.
यावेळी रोहितने टी20 विश्वचषकात विराट सलामीला येऊ शकतो, असे विधान केले आहे. तो म्हणाला, “भारतीय संघामध्ये सलामीचा तिसरा पर्याय नाही, अशा स्थितीत विराट हा सर्वोत्तम पर्याय आहे. तसेच तो काही सामन्यांमध्ये सलामीला येऊ शकतो. राहुल हा संघाचा नियमित सलामीवीर आहे.”
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत कोण येणार सलामीला हे विचारले असता त्याने राहुलचे नाव घेतले आहे. “राहुल हा सलामीला येण्याची शक्यता आहे, तर विराट हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल,” असेही रोहितने पुढे म्हटले आहे.
विराट आणि राहुलची आकडेवारी पाहता, विराटने सलामीला यावे कारण वेगवान गोलंदाजांविरुद्ध त्याचा स्ट्राईक रेट उत्तम आहे. तर राहुलने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये जी दोन शतके केली आहेत, ती त्याने तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येताना केली आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvAUS: पहिल्या सामन्यासाठी कशी असेल खेळपट्टी? किती होईल धावसंख्या, जाणून घ्या पीच रिपोर्ट
विराट यादीत पहिला क्रमांक गाठणार? सचिनच्या 100 शतकांविषयी रिकी पॉंटिंगचे मोठे वक्तव्य
विराट आता ऑस्ट्रेलियन फलंदाजांनाही नडणार! टी-20 मालिकेत गोलंदाजी करण्याची शक्यता