भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथील क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात पदार्पण करणार्या मोहम्मद सिराजने जबरदस्त गोलंदाजी केली. त्यामुळे सर्वजण त्याच्या या कामगिरीने प्रभावित झाले आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहसुद्धा सिराजच्या गोलंदाजीने खूश झाला आणि त्याने सिराजची प्रशंसा केली आहे
दुसर्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी सिराज, जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन यांनी दमदार कामगिरी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव पहिल्याच दिवशी 195 धावसंख्येवर आटोपला. त्यामुळे आता भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावातील फलंदाजीला सुरुवात केली आहे.
सिराजने पदार्पणात घेतल्या दोन महत्वपूर्ण विकेट्स
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आज (26 डिसेंबर) कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाचा पहिला आणि कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळताना सिराजने दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. या सामन्यात त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध गोलंदाजी करताना 40 धावा देताना 2 गडी बाद केले. यामध्ये धोकादायक ठरत असलेल्या मार्नस लॅब्यूशानेला सिराजने झेलबाद केले. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया कर्णधार टीम पेन आणि कॅमरॉन ग्रीन यांच्यात होत असलेली भागीदारी सुद्धा सिराजने तोडली. त्याने ग्रीनला 12 धावांवर पायचीत केले.
बुमराह म्हणाला भारतीय संघासाठी चांगले संकेत
दुसर्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 4 विकेट्स घेणार्या जसप्रीत बुमराहने आपले साथीदार अश्विन आणि मोहम्मद सिराज यांची प्रशंसा केली. बुमराह म्हणाला, “आम्हाला दोन्ही बाजूंनी दबाव निर्माण करायचा होता. अश्विनने आणि सिराजने उत्कृष्ट गोलंदाजी केली. आम्ही सर्वजण एकमेकांची मदत करण्याचा प्रयत्न करत होतो.” मोहमद सिराजबद्दल प्रशंसा करताना बुमराह म्हणाला, “तो खूप मेहनतीने इथे पोहचला आहे. लंचनंतर काहीच होत नव्हते आणि त्याने नियंत्रण निर्माण करत गोलंदाजी केली, त्यामुळे भारतीय संघासाठी हे चांगले संकेत आहेत.”
दिवसाअखेर भारताची धावसंख्या 1 बाद 36 धावा
भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला 195 धावावर सर्वबाद केले. त्यामुळे भारतीय संघाने आपल्या डावाला सुरुवात करताना पहिला दिवस संपेपर्यंत 1 बाद 36 धावा केल्या आहेत. भारतीय संघाने मयंक अगरवाल याच्या रूपाने पहिल्या षटकात 1 गडी गमावला. त्याला मिशेलने पायचीत केले. त्याचबरोबर पुजारा आणि शुबमन गिल अनुक्रमे 7 आणि 28 धावांवर नाबाद आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तान संघाला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू सहा आठवड्यांसाठी संघातून बाहेर
दक्षिण आफ्रिकन खेळाडूंची संवेदनशीलता, ‘ही’ कृती करत दिला ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ चळवळीला पाठिंबा