भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २७ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. अडीच महिन्यांच्या या प्रदीर्घ दौऱ्याची सुरुवात सिडनी येथे वनडे मालिकेने होईल. भारतीय संघाचे मुख्य लक्ष कसोटी मालिका असले, तरी मर्यादित षटकांच्या मालिकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मालिका सुरू होण्यासाठी चार दिवसांचा अवधी शिल्लक आहे. मात्र, भारतीय कर्णधार विराट कोहली सध्या पेचप्रसंगात सापडलेला दिसून येतोय. शिखर धवनसोबत वनडे मालिकेत सलामीला कोण उतरणार?, हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे.
शिखरचा साथीदार कोण ?
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या वनडे संघात शिखर धवनव्यतिरिक्त मयंक अगरवाल आणि शुबमन गिल हे दोन युवा सलामीवीर आहेत. भारताचा नवा उपकर्णधार केएल राहुलने यापूर्वी सलामीवीराची भूमिका बजावली आहे. मात्र, सध्या तो भारतीय संघाच्या मध्यफळीत खेळताना दिसून येतो.
शुबमन गिल आणि मयंक अगरवाल दोघांपैकी एक जण खेळणार
भारतीय संघ व्यवस्थापन धवनसोबत गिल आणि मयंक यांच्यापैकी एकाला संधी देऊ शकतो. या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडमध्ये झालेल्या वनडे मालिकेत मयंकने भारतीय संघासाठी तीन सामन्यात सलामी दिली होती. मात्र, या तीनही सामन्यात तो सपशेल अपयशी ठरला होता. दुसरीकडे, गिलने जवळपास दीड वर्षाच्या कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे.
विराट आणि रवी शास्त्री घेतील निर्णय
कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री सरावादरम्यान या दोन्ही युवा खेळाडूंवर विशेष लक्ष ठेवून असतात. खेळपट्टीचा अंदाज घेऊन पहिल्या सामन्यावेळी शिखर धवनसोबत सलामीला कोणाला उतरवायचे? हा निर्णय कर्णधार आणि प्रशिक्षक घेतील. सिडनी येथील सराव सत्र संपल्यानंतर, रवी शास्त्री शुबमन गिलसोबत बराच वेळ चर्चा करत असलेले दिसून आले होते.
वनडे सामन्यांसाठी तितकेसे महत्त्वपूर्ण नाही पुढील वर्ष
पुढील वर्षी भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशीप व टी२० विश्वचषक या दोन महत्त्वाच्या स्पर्धा खेळायच्या आहेत. २०२१ मध्ये वनडे प्रकारातील कोणतीही मोठी स्पर्धा खेळली जाणार नाही. त्यामुळे भारतीय संघ वनडे मालिकांकडे तितक्या गंभीरतेने पाहणार नाही. या वर्षाच्या सुरुवातीला, भारतीय संघाला न्यूझीलंडकडून वनडे मालिकेत ३-० असा दारुण पराभव पत्करावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटचा संघ पडला केएल राहुलच्या संघावर भारी; टीम इंडियाच्या खेळाडूंमध्येच रंगला सामना, पाहा फोटो
‘रोहित आणि इशांतला कसोटी मालिका खेळायची असेल तर ३-४ दिवसात विमानात बसावे लागेल, अन्यथा..’