भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघादरम्यान खेळली गेलेली दिवस-रात्र कसोटी अनिर्णित राहिली आहे. रविवारी (३ ऑक्टोबर) सामन्याच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २ बाद ३६ धावा केल्या. त्यांना २७२ धावांचे लक्ष्य मिळाले होते. पहिल्या डावाच्या जोरावर भारतीय संघाला मोठी आघाडी मिळाली होती. दोन्ही संघांमधील ही १० वी कसोटी होती.
भारतीय संघाला ४४ वर्षांपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी जिंकता आलेली नाही. पण या ४४ वर्षांत भारतीय महिला संघ प्रथमच ऑस्ट्रेलियावर आघाडी घेण्यात यशस्वी झाला होता. या दौऱ्यातील ही दुसरी दिवस-रात्र कसोटी होती आणि दोन्ही अनिर्णित राहिल्या. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी२० मालिका होणार आहे.
सामन्याच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४ गड्यांच्या मोबदल्यात १४३ धावांपासून सुरुवात केली. संघाने ९ बाद २४१ धावा करत आपला डाव घोषित केला. एलिस पेरी ६८ धावांवर नाबाद राहिली. तिने सलग चौथ्या कसोटी डावात ५० पेक्षा जास्त धावा केल्या. भारताकडून पूजा वस्त्राकरने ३ बळी घेतले. याशिवाय झुलन गोस्वामी, मेघना सिंग आणि दीप्ती शर्मा यांना प्रत्येकी २-२ बळी मिळाले. भारताने पहिल्या डावात ८ गडी बाद ३७७ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाला १३६ धावांची आघाडी मिळाली.
दुसऱ्या डावात सलामीवीर फलंदाज शेफाली वर्मा (५२) आणि स्मृती मंधाना (३१) यांनी भारतीय संघाला पुन्हा एकदा झटपट सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७० धावा जोडल्या. पूनम राऊत ४१ धावांवर नाबाद राहिली. भारतीय संघाने ३७ षटकांत ३ बाद १३५ धावा करत डाव घोषित केला आणि ऑस्ट्रेलियाला २७२ धावांचे लक्ष्य मिळाले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात १५ षटकांत २ गडी बाद ३६ धावा केल्या. झुलन गोस्वामी आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
स्म्रीती मंधानाने पहिल्या डावात २१६ चेंडूत १२७ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली होती. आपल्या खेळीत तिने २२ चौकार आणि एक षटकार मारला होता. महिला दिन-रात्र कसोटीत शतक झळकावणारी ती जगातील दुसरी खेळाडू ठरली. या कामगिरीसाठी तिला सामनावीर पुरस्कार मिळाला. याआधी ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची वनडे मालिका २-१ ने जिंकली होती.
आता तीन सामन्यांची टी -२० मालिका ७ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही एकूण १० वी कसोटी होती. ऑस्ट्रेलियाने चार कसोटी सामने जिंकले आहेत तर ६ सामने अनिर्णित राहिले आहेत. म्हणजेच आतापर्यंत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकही कसोटी जिंकू शकलेला नाही. दोन्ही संघांमध्ये पहिली कसोटी १९७७ साली खेळली गेली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
दिसतोय का रे! मॅक्सीचा गगनचुंबी षटकार गेला स्टेडिअमच्या बाहेर; पाहून तुमचेही चक्रावतील डोळे
भारी ना! पराभवानंतरही मुंबईकडून सुर्यकुमार आणि नॅथन कुल्टर-नाईलचा सन्मान, पाहा व्हिडिओ
ऑसी क्रिकेटरने स्म्रीती मंधनाचा बाउंड्री लाईनजवळ डाईव्ह मारत पकडला अद्भुत झेल, व्हिडिओ व्हायरल