बांगलादेशचा संघ सध्या भारतीय दौऱ्यावर आहे. त्यांची भारतीय संघाविरुद्ध आत्ता टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेनंतर भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 14 नोव्हेंबरपासून 2 कसोटी सामन्यांची (2 Test Matches) मालिका होणार आहेत.
यातील मालिकेतील 22-26 नोव्हेंबर या दरम्यान होणारा दुसरा कसोटी दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. हा सामना ईडन गार्डन, कोलकाता (Eden Garden, Kolkata) येथे होणार असून भारताच्या इतिहासातील पहिला दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे.
या कसोटी सामन्यासाठी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी समालोचकाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.
काही रिपोर्टनुसार क्रीडा प्रसारण वाहिनी स्टार स्पोर्ट्सने भारताच्या पहिल्या दिवस-रात्र कसोटीसाठी भारताच्या सर्व माजी कसोटी कर्णधारांना बोलवण्याच्या योजनेसंबंधी बीसीसीआयचा नवा अध्यक्ष सौरव गांगुलीशी(Sourav Ganguly) संपर्क साधला आहे.
या योजनेनुसार दिवस-रात्र सामन्याच्या पहिल्या दोन दिवसात भारताचे माजी कर्णधारांना त्यांच्या अनुभवाबद्दल विचारले जाईल.
‘या कसोटी सामन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी भारताच्या सर्व माजी कसोटी कर्णधारांना बोलावण्यात यावे. या सामन्यात दोन्ही देशांच्या राष्ट्रगीतासाठी भारत आणि बांगलादेशच्या खेळाडूंबरोबर भारताचे माजी कर्णधारही मैदानावर उभे राहतील.’
‘या कसोटी सामन्यात माजी कर्णधार कालांतराने समालोचन करतील. तसेच, आपल्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील महत्त्वाचे क्षण सांगतील,’ असे आयएएनएसच्या वृत्तानुसार स्टार स्पोर्ट्सने बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
यासाठी धोनीला आमंत्रणही पाठवण्यात आले आहे. त्यामुळे जर धोनीने हे आमंत्रण स्विकारले तर जर त्याला पहिल्यांदाच समालोचन करताना चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
या सामन्याआधी भारत विरुद्ध बांगलादेश संघातील पहिला कसोटी सामना 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान इंदोरमध्ये पार पडेल.
धोनी मागील काही महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्याने भारताकडून शेवटचा सामना 2019 विश्वचषकात जूलैमध्ये उपांत्यफेरीत न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता.





