सुमारे एक महिन्याच्या विश्रांतीनंतर टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध टी20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय संघाला बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी आणि तीन टी20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. प्रथम, दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका खेळली जाईल. पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईमध्ये सुरू होईल. त्यानंतर दुसरा सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये सुरू होईल.
याआधी या मालिकेबद्दल फारशी चर्चा झाली नव्हती. परंतु बांगलादेशच्या अलीकडच्या कामगिरीनं भारतीय संघ आणि चाहत्यांची चिंता नक्कीच वाढली असेल. बांगलादेशनं अलीकडेच झालेल्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभव केला. यासह बांगलादेशचा संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या शर्यतीत मजबूत स्थितीत आला आहे.
सध्या भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बांगलादेश, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत आहेत. अशा स्थितीत या सर्व संघांसाठी आगामी सामने अत्यंत महत्त्वाचे असतील. यामुळे भारतासाठी बांगलादेश मालिकेचं महत्त्व जास्त वाढलं आहे.
सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या टेबलमध्ये टीम इंडिया पहिल्या स्थानावर कायम आहे. मात्र फायनलमधील भारताचं स्थान अद्याप निश्चित नाही. अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यासाठी भारताला पुढील 10 पैकी किमान 5 कसोटी सामने जिंकावे लागतील. भारताला बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात एकूण 5 कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यानंतर भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाईल, जेथे 5 कसोटी सामने खेळायचे आहेत. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला सहजासहजी विजय मिळणार नाही. यामुळे टीम इंडिया बांगलादेशला हरवून पूर्ण गुण मिळवण्याचा प्रयत्न करेल. मात्र बांगलादेशने एकही सामना जिंकला किंवा ड्रॉ केला, तर भारताचा मार्ग कठीण होऊ शकतो.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत 9 सामने खेळून 74 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. भारताच्या गुणांची टक्केवारी 68.52 आहे. दुसरीकडे, चौथ्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेशचे 6 सामन्यांनंतर 33 गुण आहेत. त्यांची गुणांची टक्केवारी 45.83 आहे. पाकिस्तानला पराभूत करून बांगलादेशनं डब्ल्यूटीसीच्या शर्यतीत एंट्री केली.
बांगलादेशला सध्याच्या WTC सायकलमध्ये एकूण 6 सामने खेळायचे आहेत, ज्यात भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये प्रत्येकी दोन सामने आहेत. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात दोन सामने खेळायचे आहेत. अशा परिस्थितीत बांगलादेशचा संघ भारताविरुद्ध करिष्मा करण्यात यशस्वी ठरला, तर त्यांच्यासाठी अंतिम फेरीत जाण्याची मोठी संधी निर्माण होऊ शकते.
हेही वाचा –
काय सांगता! संपूर्ण संघ 10 रन्सवर ऑलआऊट, अवघ्या 5 चेंडूत संपला सामना!
दुलीप ट्रॉफीमध्ये श्रेयस अय्यरची फ्लॉप कामगिरी कायम, बांग्लादेश कसोटी मालिकेतून बाहेर?
आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्याच्या पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारे टाॅप-5 फलंदाज