अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामना भारताने १० विकेट्सने जिंकला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताने दुसऱ्याच दिवशी विजय मिळवत एक अनोखा विक्रमही केला आहे.
हा सामना केवळ १४०.२ षटकांत म्हणजेच केवळ ८४२ चेंडूत संपला. त्यामुळे भारतात सर्वात जलद संपलेला हा सामना ठरला आहे. याआधी हा विक्रम २०१९ साली कोलकाता येथे बांगलादेश विरुद्ध झालेल्या सामन्याच्या नावावर हा विक्रम होता. विशेष म्हणजे तो सामनाही दिवस-रात्र कसोटी सामना होता. हा सामना ९६८ चेंडूत संपला होता.
दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वात कमी चेंडूत संपलेला सामना
अहमदाबादला झालेला हा सामना दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या कसोटी सामन्यांत सगळ्यात लवकर संपलेला सामना आहे. याआधी १९४६ मध्ये न्यूझीलंड वि ऑस्ट्रेलिया हा सामना ८७२ चेंडूंत संपला होता. तसेच एकूण इतिहास पाहाता हा सर्वात जलद संपलेला सातवा सामना आहे. सगळ्यात कमी चेंडूत संपलेल्या सामन्याचा विक्रम १९३२ मध्ये ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका या सामन्यात झाला होता. हा सामना ६५६ चेंडूंत संपला होता.
सर्वात कमी चेंडूत संपलेले कसोटी सामने
६५६ चेंडू – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मेलबर्न, १९३२
६७२ चेंडू – वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड, ब्रिजटाऊन, १९३५
७८८ चेंडू – इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मेलबर्न, १८८८
७९२ चेंडू – इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लॉर्ड्स, १८८८
७९६ चेंडू – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, केपटाऊन, १८८९
८१५ चेंडू – इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, द ओव्हल, १९१२
८४२ चेंडू – भारत विरुद्ध इंग्लंड, अहमदाबाद, २०२१
असा झाला सामना –
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली होती. पण इंग्लंडचा पहिला डाव ४८.४ षटकांत ११२ धावांत संपला. इंग्लंडकडून या डावात जॅक क्रॉलीने सर्वाधिक ५३ धावांची खेळी केली. अन्य फलंदाजांना २० धावांचा टप्पाही पार करता आला नाही. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या. तर आर अश्विनने ३ विकेट्स आणि इशांत शर्माने १ विकेट घेतली.
त्यानंतर भारताचा पहिला डाव ५३.२ षटकांत १४५ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून पहिल्या डावात रोहित शर्मालाच अर्धशतकी खेळी करता आली. त्याने ६६ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय केवळ विराट कोहलीने २० धावांचा टप्पा ओलांडला. त्याने २७ धावा केल्या. अन्य कोणच्याही फलंदाजाला फार काही खास करता आले नाही. इंग्लंडकडून जो रुटने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या आहेत. तर जॅक लीचने ४ आणि जोफ्रा आर्चरने १ विकेट्स घेतल्या.
इंग्लंडचे फलंदाजी दुसऱ्या डावातही ढेपाळली. इंग्लंडचा दुसरा डाव ३०.४ षटकांत ८१ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात बेन स्टोक्सने सर्वाधिक २५ धावा केल्या. त्याच्याशिवाय जो रुट(१९) आणि ऑली पोप (१२) यांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तर आर अश्विनने ४ विकेट्स घेतल्या. तसेच वॉशिंग्टन सुंदरला १ विकेट मिळाली. तसेच भारताने पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी घेतल्याने भारतासमोर ४९ धावांचे आव्हान होते.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन सलामीला फलंदाजीला उतरले. या दोघांनीही विकेट न गमावता ४९ धावांचे आव्हान पूर्ण केले. रोहितने नाबाद २५ धावा आणि शुबमनने नाबाद १५ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
अवघ्या ९ वर्षात अश्विनने गाठला ४०० बळींचा टप्पा, ‘या’ खास यादीत गाठले दुसरे स्थान
भारताच्या विजयानं इंग्लंडचे कसोटी चॅम्पियनशीपचं स्वप्न भंगलं; आता भारत, ऑस्ट्रेलियामध्ये चूरस
दिवस-रात्र कसोटीत अक्षर पटेलने इंग्लंड संघाला दाखवले चांदणे, ‘हा’ विक्रम करणारा बनला पहिलाच गोलंदाज