नाॅटिंगघम | भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना १८ आॅगस्टपासून ट्रेंट ब्रीज येथे सुरु होत आहे. भारतीय संघाल पहिल्या कसोटी सामन्यात केवळ ३१ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले तर दुसऱ्या कसोटीत संघाचा दारुण पराभव झाला.
सध्या संघ मालिकेत ०-२ असा पिछाडीवर आहे. त्यात पहिल्या तीन कसोटी सामन्यासाठी १८ खेळाडूंच्या नावाची आधीच घोषणा झाली आहे. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाला आहे त्या १८ खेळाडूंमधून सर्वोत्तम टीम निवडण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
त्यात भारतीय संघाची सलामी बाजू दौऱ्यापुर्वी जेवढी भक्कम वाटत होती तेवढीच ती आता कमकुवत वाटत आहे. मुरली विजय, केएल राहुल आणि शिखर धवन या तिघांनाही कोणतीही विशेष कामगिरी करता आलेली नाही.
पहिल्या दोन सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या १० खेळाडूंमध्ये एकही भारतीय सलामीवीर नाही. यावरुनच त्यांच्या कामगिरीचा अंदाज येतो.
मुरली विजय सध्या कारकिर्दीतील सर्वात कठीण काळातून जात आहे. दुसऱ्या कसोटीत तर त्याला दोन्ही डावात भोपळाही फोडता आला नाही. तरीही एक शेवटची संधी म्हणुन त्याला तिसऱ्या कसोटीत संघ व्यवस्थापन नक्की खेळवेल. तिसऱ्या कसोटीतील कामगिरीवरच विजयच्या पुढील मालिकेतील तसेच कारकिर्दीचे भविष्य ठरणार आहे.
केएल राहुलही सध्या अशाच काहीशा फाॅर्ममधून जात आहे. अगदी ढिसाळ फटके मारुन बाद होण्याची जणु खासियतच या तरुण खेळाडूत आहे. निष्काळीपणा त्याच्या देहबोलीतून या मालिकेत चांगलाच जाणवला आहे. २६ कसोटीत ४ शतके आणि तब्बल ११ अर्धशतके करणाऱ्या या खेळाडूची लय तो भारतीय उपखंडातच विसरुन आलाय की काय इतपत शंका यावी असा खेळ त्याने या मालिकेत केला आहे. तरीही एक तरुण प्रतिभावान खेळाडू म्हणुन त्यावर संघ व्यवस्थापन विश्वास ठेवेल.
या दोन खेळाडूंना संधी दिली तर आपोआपच शिखर धवन हा संघातून सलग दुसऱ्या कसोटीत बाहेर राहिल.
दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात चांगल्या लयीत असलेला पुजारा धावबाद झाला तर दुसऱ्या डावात चांगला स्थिरावलेला असताना त्याला ब्राॅडने त्रिफळाचीत केले. पुजाराने लौकीकाला साजेशी कामगिरी केली नसली तरी संघातील अन्य ५-६ फलंदाजांपेक्षा ती नक्कीच चांगली होती.
विराट कोहलीने गेल्या दोन दिवस कसुन सराव केला आहे. तो तिसऱ्या कसोटी खेळेल की नाही याबद्दल मोठी चर्चा होती. परंतु त्याचा एकंदरीत सराव पाहुन तो तिसऱ्या कसोटीत नक्की खेळेल. त्यात या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारताचा हा कर्णधार अव्वल स्थानी आहे. विराटच्या निव्वळ संघात असण्यानेही खेळाडूंमध्ये एकप्रकारे उर्जा संचारते. एक कर्णधार म्हणुन दुसऱ्या कसोटीत विराटचे काही निर्णय नक्कीच चुकले परंतु एकदा घडलेली चुक पुन्हा न करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो.
अजिंक्य रहाणेच्या समावेशाबाबत कितीही चर्चा असली तरी कर्णधार विराट आपल्या या डेप्युटी कर्णधाराला तिसऱ्या कसोटीत पुन्हा नक्की संधी देईल. दुसऱ्या कसोटीत एकवेळ चांगली फलंदाजी करत असलेला रहाणे एक खराब फटका खेळल्यामुळे दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराला त्याबरोबर मोठी भागीदारी उभारता आली नाही. पहिल्या डावात ४४ तर दुसऱ्या डावात ३३ चेंडू खेळत त्याने दुसऱ्या कसोटीत दोन्ही डावात चांगली सुरुवात केली होती.
गेल्या सामन्यात चांगली कामगिरी न करणाऱ्या दिनेश कार्तिकची मात्र तिसऱ्या सामन्यात नक्की विकेट जाणार आहे. या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हा खेळाडू १९व्या स्थानी आहे. ४ डावात जेमतेम २१ धावा करणाऱ्या कार्तिकपेक्षा इंग्लंडच्या गोलंदाजांनी जास्त धावा केल्या आहेत.
उत्तराखंडचा स्टार यष्टीरक्षक रिषभ पंतला या सामन्यात संधी दिली जाऊ शकते. त्याने गेल्याच महिन्यात द्रविड प्रशिक्षक असलेल्या इंडिया अ कडून खेळताना इंग्लंड लायन्सविरुद्ध चमकदार कामगिरी केली होती. तसेच त्याला संधी देण्याबद्दल मोठी चर्चा आहे. फेब्रुवारी २०१७ला भारताकडून टी२०मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या या खेळाडूला वनडे आणि कसोटीत मात्र दीड वर्षांनीही संधी मिळालेली नाही. गेल्या चार सामन्यात त्याने नाबाद ३४, ६१, नाबाद ६७ आणि नाबाद ६४ अशा खेळी केल्या आहेत. या सर्व खेळी त्याने इंग्लंडमध्येच केल्या आहेत हे विशेष.
अपेक्षा नसतानाही या मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या अश्विनला तिसऱ्या कसोटीतही अपेक्षेप्रमाणे संधी मिळणार आहे. फलंदाजीत भारताकडून या मालिकेत तिसऱ्या क्रमांकाच्या धावा तर गोलंदाजीत २ सामन्यात ७ विकेट घेत अॅंडरसन पाठोपाठ त्याने दुसरा क्रमांक पटकला आहे. विराटपाठोपाठ मालिकेत जर भारताकडून कुणी सर्वोत्तम कामगिरी केली असेल तर तो खेळाडू म्हणजे अश्विन. यामुळे एक अष्टपैलू खेळाडू म्हणुन या दौऱ्यावर गेलेल्या हार्दिक पंड्याला तिसऱ्या कसोटीत मात्र आपले स्थान गमवावे लागु शकते. त्याने दोन सामन्यात ३ विकेट्स आणि ४ डावात ९० धावा केल्या आहेत.
गोलंदाजीत एक फिरकीपटूबरोबर संघव्यवस्थापन ४ वेगवान गोलंदाज खेळवण्याचा दाट विचार करेल. त्यामुळे कुलदीप यादवला या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. इशांत शर्मा (७ विकेट्स), मोहम्मद शमी (६ विकेट्स) आणि पहिल्या सामन्यात संधी मिळालेल्या उमेश यादवने घेतलेल्या ३ विकेट्समुळे भारतीय वेगवान गोलंदाजी भक्कम भासत आहे. त्यात भारतीय गोलंदाजांची यावर्षीची परदेशातील सरासरी पाहिली तर याचा चटकन अंदाज येतो.
इशांतचा अनुभव आणि सध्याचा फाॅर्म, शमीसारख्या गोलंदाजाकडे विकेट घेण्याची क्षमता तसेच उमेशचा पहिल्या सामन्यातील नियंत्रीत मारा आणि विराटबरोबर योग्यवेळी केलेली भागीदारीमुळे या तीन गोलंदाजांना या सामन्यात संधी दिली जाईल. दुसऱ्या कसोटीत उमेश ऐवजी संधी मिळालेल्या कुलदीपला चमक दाखवता आली नाही आणि कर्णधारासह संघ व्यवस्थापनाला अयोग्य संघनिवडीबद्दल टीकेला सामोरे जावे लागले होते.
जसप्रित बुमरालाही या सामन्यात जर तो फिट असेल तर संधी मिळणार आहे. तो फिट असल्याची वृत्त गेली काही दिवस सतत येत आहे. तो या सामन्यासाठी फिट असेल तर त्याला या सामन्यात ४था वेगवान गोलंदाज म्हणुन संधी मिळेल.
त्यामुळे या सामन्यात कुलदीपच्या जागी उमेश यादव, दिनेश कार्तिकच्या जागी रिषभ पंत तर हार्दिक पंड्याच्या जागी अष्टपैलू खेळाडू म्हणुन अश्विन खेळताना दिसु शकतो. तर वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह गोलंदाजीच्या ताफ्यात असेल.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–खास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी
–खेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश
–टीम इंडियाने वाहिली अजित वाडेकरांना श्रद्धांजली