---Advertisement---

ENGvIND: शेवटच्या वनडेपुर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, कर्णधार मिताली राज पूर्णपणे फिट

On: शनिवार, जुलै 3, 2021 11:18 AM
---Advertisement---

भारतीय महिला संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघात ३ सामन्यांची वनडे मालिका चालू आहे. या मालिकेतील पहिले २ सामने पार पडले आहेत. यजमान इंग्लंडने या दोन्ही वनडे सामन्यात पाहुण्या भारताला धूळ चारत २-० ने मालिकेत आघाडी घेतली आहे. उर्वरित तिसरा आणि शेवटचा सामना शनिवारी (०३ जुलै) दुपारी ३.३० वाजता सुरू होणार आहे. तत्पुर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी पुढे आली आहे. कर्णधार मिताली राज या सामन्यात खेळण्यासाठी सज्ज झाली आहे.

दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान ३८ वर्षीय मितालीला घश्यात वेदना होत होत्या. त्यामुळे ती दुसऱ्या डावातून बाहेर पडली होती. यावेळी उपकर्णधार हरमनप्रीत कौर हिने नेतृत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. यानंतर तिच्या तिसऱ्या वनडेत खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. परंतु आता ती पूर्णपणे फिट झाली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने यासंदर्भात माहिती दिली आहे. ट्विट करत बीसीसीआय़ने लिहिले आहे की, ‘भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज आता पूर्णपणे बरी झाली आहे. ती उद्या (०३ जुलै) न्यू रोड स्टेडियम, वोर्सेस्टर येथे होणाऱ्या तिसऱ्या वनडेसाठी संघासोबत सरावही करत आहे.’

व्हाईटवॉशपासून वाचण्यासाठी भारतीय संघाची परिक्षा
दुर्दैवाची बाब अशी की, भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन्हीही सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. ब्रिस्टल येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडने ८ विकेट्सने विजयी सुरुवात केली. तर दुसऱ्या वनडेत काट्याची टक्कर देऊनही भारताचा ५ विकेट्सने पराभव झाला. यानंतर आता तिसरा आणि शेवटचा वनडे सामना जिंकत इंग्लंड भारताला क्लिन स्विप करण्याच्या प्रयत्नात असेल.

परंतु कर्णधार मिताली आणि संघ इंग्लंडच्या अपेक्षांवर पाणी फेरत गोड शेवट करण्यासाठी झगडताना दिसतील.

महत्त्वाच्या बातम्या-

विराट कोहलीच्या नेतृत्त्वपदावर टांगती तलवार, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मिळतील फक्त ४ महिने!

भयावह प्रसंग! लाईव्ह सामन्यात अचानक विंडीजच्या २ खेळाडूंना आली चक्कर, रुग्णालयात केलं भरती

श्रीलंका दौऱ्यानंतर इंग्लंडला उड्डाण भरणार ‘हा’ भारतीय सलामीवीर, घेणार शुबमनची जागा?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---