इंग्लंड महिला विरुद्ध भारत महिला यांच्यादरम्यान सुरू असलेल्या कसोटी सामन्यातील दुसरा दिवस अनेक चढ-उतारांचा राहिला. पहिल्या सत्रात इंग्लंडने काहीसे वर्चस्व गाजवले नंतर दुसऱ्या सत्रात भारतीय संघाचे पारडे जड राहिले. स्मृती मंधाना व शेफाली वर्मा यांनी भारतीय संघाला विक्रमी सलामी दिली. मात्र, दिवसाखेर, इंग्लंडने भारताचे पाच फलंदाज तंबूत पाठवत भक्कम आघाडीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
डंकलीची झुंजार खेळी
पहिल्या दिवसाच्या ६ बाद २६९ धावांवरून इंग्लंडचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी सुरु झाला. पदार्पण करणाऱ्या सोफीया डंकली हिने दमदार अर्धशतक झळकावले. तीला सोफी एकलस्टन व ऍना श्रबसोले यांनी योग्य साथ दिली. श्रबसोले ४७ धावांवर बाद झाल्यानंतर इंग्लंडने ९ बाद ३९६ धावांवर आपला डाव घोषित केला. डंकली ७४ धावांवर नाबाद राहिली. भारतातर्फे पदार्पण करणाऱ्या स्नेह राणा व दिप्ती शर्मा यांनी अनुक्रमे ४ व ३ बळी आपल्या नावावर केले.
स्मृती-शेफालीची विक्रमी भागीदारी
भारतीय संघासाठी स्मृती मंधाना व पदार्पणवीर शेफाली वर्मा यांनी सलामी दिली. इंग्लंडच्या अनुभवी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत त्यांनी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केली. शतकाचा नजीक असताना शेफाली ९६ धावांवर बाद झाली. दोघींनी भारताला १६७ धावांची सलामी दिली. जी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधील भारतीय संघासाठीची सर्वोत्तम सलामी आहे.
भारतीय संघाची घसरगुंडी
शेफाली बाद झाल्यानंतर स्मृती ७८ धावांवर तंबूत परतली. स्मृती बाद झाली तेव्हा संघाची धावसंख्या १७९ अशी होती. मात्र, त्यानंतर भारतीय संघाची आश्चर्यकारक घसरगुंडी झाली. पूनम राऊत (२), कर्णधार मिताली राज (२) व शिखा पांडे शून्य धावा काढून तंबूत परतल्या. दिवसाखेर भारताचा डाव ५ बाद १८७ धावांवर थांबला होता. इंग्लंडसाठी कर्णधार हीदर नाईटने दोन तर, ऍना श्रबसोले, सोफी एकलस्टन व नतालिया सिवर यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.
महत्वाच्या बातम्या:
इंग्लंडच्या दोन माजी कर्णधारांनी WTC फायनलसाठी टाकले या संघाच्या पारड्यात वजन
नितीश राणाने या खेळाडूकडून आयपीएलमध्ये घेतले फलंदाजीचे सल्ले
दुर्दैवी शेफाली! चार धावांनी हुकले पदार्पणातील शतक, पण नावे केले हे विक्रम






