-अनिल भोईर
दुबई येथे सुरू असलेल्या कबड्डी मास्टर्स स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारत व इराण संघांनी विजयाचा चौकार मारला आहे. दोन्ही संघांनी साखळीतील सर्व सामने जिंकत सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.
भारताने केनिया विरुद्धच्या आपल्या शेवटच्या सामन्यात पाचव्या मिनिटाला केनियावर लोन देत ११-० अशी भक्कम आघाडी घेतली होती. प्रदीप नरवालला आज पहिल्या सातमध्ये स्थान देण्यात आलं होतं. सुरुवातीपासून झटापट चढाय्या करत प्रदीपने गुण मिळवले.
सामन्याच्या मध्यंतरापूर्वी भारताने दोन बदल करत राहुल चौधरी व मनजीत चिल्लरला संधी दिली. राहुल चौधरीने एका चढाईत दोन खेळाडूंना बाद करत केनियावर दुसरा लोन देत मध्यंतरापर्यत भारताने २९-५ अशी सामन्यावर पकड मिळवली होती.
मध्यंतरानंतर चौथ्या मिनिटाला राहुल चौधरीने उजव्या कोपरात केनियाच्या दोन खेळाडूंना एकाचवेळी दोन्ही हातांनी बाद करत केनियावर तिसरा लोन दिला. राहुल चौधरीने चढाईत सर्वाधिक ९ गुण तर प्रदीप नरवालने ७ गुण मिळवले. नाडा व मोहितनेे प्रत्येकी ४-४ पकडी केल्या.
शेवटच्या चढाईत सुरजितने सुपररेड करत ५०-१५ अशी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. भारताच्या विजयी चौकराच्या आधी इराणने अर्जेन्टिनाचा ५७-२७ असा पराभव करत आपल्या ग्रुपमध्ये चारही सामने जिंकून सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला.
साखळीतील शेवटचे दोन सामने शिल्लक आहेत. भारताचा सेमी फायनलचा सामना दक्षिण कोरिया विरुद्ध २९ जूनला होणार आहे. इराणचा सेमिफायनल सामना पाकिस्तान किंवा केनिया यांच्या विरुद्ध होईल.
कबड्डी मास्टर्स दुबई २०१८ गुणतालिका:
अ गट-
१) भारत – ४ सामने – २० गुण
२) पाकिस्तान – ३ सामने – ०५ गुण
३) केनिया – ३ सामने – ०० गुण
ब गट-
१) इराण – ४ सामने – २० गुण
२) द. कोरिया – ३ सामना – ०६ गुण
३) अर्जेन्टिना – ३ सामना – ०० गुण
महत्त्वाच्या बातम्या:
–चौथ्या कबड्डी विश्वचषकाचे यजमानपद भारताला नाही तर या देशाला मिळणार!
–महाराष्ट्राचा कर्णधार रिशांक देवाडीगाने दुबई मास्टर्स स्पर्धेत केले समालोचन