भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिकेत भारताने तीनही सामन्यात पाहुण्या संघाला मात दिली. सध्या न्यूझीलंड संघाविरुद्ध टी20 मालिका सुरु आहे. न्यूझीलंडविरुद्ध पहिला टी- 20 सामना शुक्रवार (दि. 27 जानेवारी) रांची येथे खेळवला गेला. न्यूझीलंड संघाने 176 धावा केल्या, ज्या पार करण्यात भारतीय संघ अपयशी ठरला. अशात भारतीय संघाचा पहिल्याच सामन्यात 21 धावांनी पराभव झाला. या पराभवासाठी अर्शदीप सिंग याला जवाबदार धरले जात आहे. नक्की या सामन्यात भारत कुठे चुकला? हा सामना भारताच्या हातातून कसा निसटला? ते आपण बघूयात…
न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) पहिला टी20 (T20 match) सामना रांची येथे झाला. न्यूझीलंड संघाने 6 विकेट्स गमावत 176 धावा केल्या. विजयासाठी भारतापुढे 177 धावांचे आव्हान ठेवले गेले. हे आव्हान पार करताना भारतीय संघ मैदानात आला आणि निर्धारित 20 षटकात 9 बाद 155 धावा केल्या. परिणामी भारताला या सामन्यात 21 धावांनी पराभवाचा धक्का बसला.
अर्शदीपची खराब कामगिरी
न्यूझीलंड संघाच्या डावात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने 4 षटके गोलंदाजी करताना 51 धावा खर्च केल्या. तसेच, यावेळी त्याला फक्त एक विकेट घेण्यात यश आले. विशेष म्हणजे, डावातील 20वे षटक टाकत असताना त्याच्या गोलंदाजीवर फलंदाज डॅरिल मिचेल (Daryl Mitchell) याने पहिल्या तीन चेंडूवर सलग तीन षटकारांची बरसात केली. त्यामुळे या षटकात अर्शदीपकडून 27 धावा खर्च केल्या गेल्या.
वरची फळी झटपट बाद
न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून सलामीला शुबमन गिल (Shubman Gill) आणि ईशान किशन (Ishan Kishan) उतरले होते. यावेळी दोघेही सपशेल फ्लॉप ठरले. गिलने 7 धावा, तर किशनने 4 धावा केल्या आणि तंबूचा रस्ता धरला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) फलंदाजीला आला. मात्र, तो अपेक्षेनुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरला. त्याने यावेळी त्याने 6 चेंडू खेळले आणि एकही धाव करू शकला नाही. तो शून्यावर बाद झाला. अशाप्रकारे वरची फळी फ्लॉप ठरली. त्यामुळे मधल्या फळीवरील दबाव वाढला.
सामन्यात पुनरागमन केले, पण विकेट्स गमावल्याने पराभवाचा धक्का
लक्ष्य मोठे होते पण संघाची सुरुवात खूपच खराब झाली, परंतु असे असूनही भारतीय संघाला हा सामना जिंकता आला असता. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि सूर्यकुमार यादव यांनी चौथ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावरच भारताने सामन्यात पुनरागमन केले. सूर्यकुमार 47 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर कर्णधार (Team India Captain) हार्दिक पंड्याला 20 चेंडूत केवळ 21 धावा करता आल्या. सूर्या बाद झाल्यानंतर तोही संघर्ष करत राहिला. त्याच्यानंतर अष्टपैलू दीपक हुडा फलंदाजीसाठी आला. हुड्डालाही 10 चेंडूत केवळ 10 धावा करता आल्या.
इथून पुढे चाहत्यांनीही विजयाच्या आशा सोडल्या होत्या, पण वॉशिंग्टन सुंदरने शेवटपर्यंत चांगली झुंज दिली, पण संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही. यादरम्यान त्याने 28 चेंडूत 178च्या स्ट्राईक रेटने 50 धावा केल्या. या धावा करताना त्याने 3 षटकार आणि 5 चौकारांची बरसात केली.
या सामन्यात न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली. फिन ऍलेन आणि डेवॉन कॉनवे यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. फिन ऍलनने 23 चेंडूत 35 धावा केल्या, तर कॉनवेने 35 चेंडूत 52 धावा केल्या. याव्यतिरिक्त डॅरिल मिचेलने अर्शदीपच्या गोलंदाजीवर चांगला चोप देत सामन्यात सर्वाधिक 59 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंड संघाला भारतापुढे मोठे आव्हान ठेवण्यात यश आले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! क्रिकेट खेळताना हाणामारीत युवक गंभीर जखमी, उपचारादरम्यान गेला जीव
कौतुक केलंच पाहिजे! 12 डावात न जमलेली कामगिरी सुंदरने एकाच डावात करून दाखवली, एक नजर टाकाच