क्रिकेटमध्ये असे खुप कमी वेळा झाले असावे की, जेव्हा एखादा खेळाडू संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नसताना देखील त्याला एखादे पारितोषिक मिळाले असेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात असा योगायोग पाहायला मिळाला. न्यूझीलंड संघाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल सॅंटनरला भारताविरुद्ध कसोटी मालिकेतील एकाही सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले नव्हते. मात्र, तरी देखील त्याने दुसरा सामना संपल्यानंतर पारितोषिक जिंकले.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेचा दुसरा आणि शेवटचा सामना सोमवारी संपला. दुसऱ्या सामन्यात भारताने ३७२ धावांनी मोठा विजय मिळवला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडच्या मिचेल सॅंटनरला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. परंतु, एका दुसऱ्या खेळाडूच्या बदली खेळाडूच्या रूपात सॅंटनरला संघासाठी योगदान देता आले. सॅंटनरने सामन्यात केलेल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी ‘बेस्ट सेव ऑफ द मॅच’ पुरस्काराने संन्मानित करण्यात आले.
त्याने भारताच्या डावाच्या ४६ व्या षटकात उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले. यासाठी त्याला १ लाख रुपयांचे बक्षीस देखील मिळाले. विल समरविलच्या गोलंदाजीवर भारताच्या श्रेयस अय्यरने मिड विकेटच्या दिशेने षटकारासाठी एक मोठा फटका मारला होता. त्याने मारलेला हा चेंडू सहज सीमारेषेपार गेला असता, पण सॅंटनरने हा चेंडू सीमारेषेपार जाण्यापासून रोखला. सॅंटनर त्यावेळी सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. त्यावेळी त्याने एक उंच उडी मारून अय्यरने हा षटकारासाठी मारलेला चेंडू रोखला आणि मैदानात फेकला. या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी चाहत्यांनी सॅंटनरसाठी टाळ्या वाजवून कौतुक केले.
दरम्यान, भारताने या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडसमोर विजयासाठी ५४० धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. न्यूझीलंड संघ लक्ष्याचा पाठलाग करताना अवघ्या १६७ धावा करू शकला होता. मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत झाला. त्यानंतर भारताने दुसऱ्या सामन्यात ३७२ धावांनी विजय मिळवला. भारताने विजयासोबतच कसोटी मालिकादेखील १-० अशा फरकाने जिंकली. तत्पूर्वी, रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेत ३-० असा विजय मिळवला होता. एकंदरीत पाहता न्यूझीलंड संघाला या भारत दौऱ्यात एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही.
महत्वाच्या बातम्या –
लाईव्ह सामन्यात जेव्हा विराट कोहलीने घेतली कॅमेरामनची फिरकी, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
क्षेत्ररक्षण करताना एजाजचा स्टँडमध्ये बसलेल्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद, व्हिडिओ व्हायरल
‘फिरकीपटूंचा सामना करण्यासाठी अगरवालच्या फलंदाजीतून घेतला धडा’, न्यूझीलंडच्या अर्धशतकवीराचा खुलासा